कॅलिफोर्नियाचे पॉपी रिझर्व्ह

>> ऐश्वर्या कोकाटे

कॅलिफोर्नियात राहून आता सुमारे 24 वर्षं झाली. तेथील ‘पॉपी रिझर्व्ह’ या पुष्पवनाबद्दल बरेच काही ऐकून होते. मात्र शेजारीच आहे, जाऊ कधी तरी असे करता करता शेवटी या वर्षी तो दिवस उगवला! काही मित्रमैत्रिणींसोबत एक दिवसाची सहल ठरली. अगदी मराठी स्टाइल डब्बा पिकनिक करूया हेही ठरलं. सकाळी 7 वाजता आम्ही सगळे निघालो. खूप ऊन व्हायच्या आत तिकडे पोहोचायला हवं होतं. कारण तिकडे सुमारे तीन-चार मैल तरी चालत जावे लागते आणि सुमारे 3 हजार 500 फुटांची चढण करायची तयारी हवी.

जसा ऍण्टलोप व्हॅलीच्या भागात प्रवेश केला तेव्हाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुले दिसायला लागली. रस्त्याच्या बाजूला गाडय़ा थांबल्या आणि आम्ही लहान मुलांसारखे फुलांच्या मधल्या पाऊलवाटेतून धावायला सुरुवात केली. त्या वेळेस आपलं वय काय, आपण कुठे आहोत याचं कसलंही भान राहिलं नाही. मग बरेच फोटो, गप्पाटप्पा करत लक्षात आलं की अजून आपल्याला त्या मुख्य स्थानाजवळ जायचं आहे. तिकडे गेलो तर प्रचंड गर्दी. जितकी फुलं तितकीच माणसं! लांबच लांब पार्किंग, पण मनात उत्साह असल्याने त्याचे काहीच वाटले नाही. आम्ही त्या रिझर्व्हच्या मुख्य दाराजवळ येऊन पोहोचलो. आता मात्र खरं चढणं सुरू झालं होतं, पण जसजसे आम्ही चढत होतो तस तसा पॉपी फुलांच्या पठाराचा प्रचंड विस्तार पाहून अवाक् व्हायला होत होतं. जिकडे बघावी तिकडे नुसती शेंदरी फुलं! जणू आम्ही एका निराळय़ाच जगात गेलो होतो. ही फुलं मुद्दाम लावलेली नसून नैसर्गिक आहेत हे लक्षात आल्यावर तर आणखीच आश्चर्य वाटलं. खरं तर कॅलिफोर्नियाचा हा भाग वाळवंटी आहे आणि म्हणून या भागात दुसरी मोठी झाडं किंवा शेती होत नाही. मात्र येथे सर्वदूर पसरलेली ‘पॉपी’ फुलं सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

ऍण्टलोप व्हॅली ही लॉस एंजलिसच्या उत्तरावर लेंकास्टर या ठिकाणी आहे. कॅलिफोर्निया पॉपी हे 1903 मध्ये त्या प्रदेशाचे फूल म्हणून निवडले गेले. सुंदर, सोनेरी, शेंदरी रंगाचं हे फूल चार पाकळय़ांचं असून फांदीवर ताठ उभं राहतं. दोन-तीन इंच लांबीचं हे फूल एक-दोन इंच रुंद असतं. फांदी साधारण चार ते बारा इंचाची असू शकते. गमतीशीर बाब म्हणजे या फुलांना अंधार आवडत नाही. रात्री यांच्या पाकळय़ा मिटतात. पुन्हा सूर्योदय झाला की पुन्हा फुलतात. वातावरण ढगाळलेले असेल तेव्हा पॉपी फुलाच्या पाकळय़ा दिवसादेखील बंद होतात. साधारण सकाळच्या 11-12 वाजता हे फूल संपूर्ण उमललेलं असतं. ही फुलं वार्षिक असतात आणि साधारण फेब्रुवारी ते मेच्या दुसऱया आठवडय़ापर्यंत त्यांचा बहर असतो. ही फुलं सुमारे 1745 एकर भूभागावर पसरलेली दिसतात. या फुलांना फ्लेम फ्लॉवर, कोपा डी ओरो (सोन्याची वाटी) सुद्धा म्हणतात. खरंच जर आपण या फुलाचा फोटो लक्ष देऊन बघितला तर त्याचा आकार सोन्याच्या वाटीसारखाच दिसतो. या फुलाचं औषधी महत्त्वदेखील आहे. अनिद्रा, अंगदुखीवर याच्यापासून औषध बनवले जाते. मात्र हे अफू म्हणजे ओपीयम पॉपी नाहीये, ही वेगळी प्रजाती आहे. ऍण्टलोप व्हॅलीच्या व्यतिरिक्त कॅलिफोर्नियामध्ये बेयर व्हॅली, सेन लुईस ओबिस्पो, लेक एल्सिनोरल या भागातही होतात. कॅलिफोर्नियाव्यतिरिक्त ओरेगन, वॉशिंग्टन, नेवाडा, ऑरिझोना, न्यू मेक्सिकोपर्यंतही पॉपी फुलांची पठारे पसरलेली दिसतात. पॉपी फुलांच्या व्यतिरिक्त या रिझर्व्हमध्ये दुसरी प्रजातीची फुलंदेखील उगवतात. ही फुलं जांभळय़ा, पांढऱया आणि पिवळय़ा रंगाची असतात. ती शेंदरी रंगाच्या पॉपी फुलांसोबत मिसळली जातात तेव्हा ते चित्र एखाद्या सुंदर गालीच्यासारखे दिसते.

ऍण्टलोप व्हॅलीतील पॉपी रिझर्व्हचा विचार करताना अमेरिकन संस्कृतीचे वैशिष्टय़ म्हणता येईल अशी एक गोष्ट लक्षात येते. कॅलिफोर्नियातील हे अतिशय सुंदर पॉपी फुलांचे पठार किंवा पॉपी रिझर्व्ह जाणीवपूर्वक नैसर्गिकच ठेवले जाते. त्या ठिकाणी कुठलेही प्रयोग केले जात नाहीत. आणखी बिया पेरून त्यांची कृत्रिम शेती केली जात नाही. एवढेच नव्हे तर येथील फुलांना पाणीदेखील दिले जात नाही. थोडक्यात ते जसे नैसर्गिक उगवतात तसेच त्यांना ठेवले जाते. म्हणूनच या पॉपी रिझर्व्हचे महत्त्व आगळेवेगळे आहे.

पॉपी फूल
या रिझर्व्हमध्ये सुमारे सात मैल (11 किलोमीटर)ची पाऊलवाट तयार करण्यात आली आहे. कॅलिफोर्निया सरकार याची देखरेख करते. या वर्षी एक नावीन्य म्हणजे ‘मोबाईल टूर’ असे स्मार्टफोन ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या आधारे तुम्ही आपल्या फोनवर या जागेचा नकाशा, पाऊलवाट, या जागेबद्दलची माहिती अशा सगळय़ा गोष्टी ऐकू शकता. 6 एप्रिल रोजी कॅलिफोर्निया पॉपी दिन (पॉपी डे) आणि 13 ते 18 मे हा ‘पॉपी आठवडा’ (पॉपी वीक) म्हणून साजरा केला जातो. एप्रिल महिन्याच्या शेवटी रिझर्व्हपासून 15 मैल अंतरावर जगप्रसिद्ध पॉपी उत्सव साजरा केला जातो. ही दोन दिवसांची ‘जत्रा’च असते. लाखो लोक तेथे जमतात. विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रम होतात.

पॉपी रिझर्व्ह हे कॅलिफोर्नियाचे एक आगळेवेगळे आणि सुंदर नैसर्गिक वैशिष्टय़ आहे. आपल्या महाराष्ट्रात जसे कास पठार आहे त्याच धर्तीवरचे हे कॅलिफोर्नियाचे पॉपी रिझर्व्ह म्हणता येईल.

[email protected]
(संपादिका – www.marathicultureandfestivals.com)

आपली प्रतिक्रिया द्या