
बॉलीवूड सेलिब्रेटींच्या मुलाखतींचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’ आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. येत्या 7 जुलैपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर ‘कॉफी विथ करण’चा सातवा सीझन पाहता येईल. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे. तसेच मागील काही सीझनची माहिती देणारा व्हिडीओदेखील शेअर केला. आगामी सातवा सीझन खूप भव्य आणि अधिक आकर्षक असल्याचेही करणने सांगितले.
छोटय़ा पडद्यावर करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो 2004 साली सुरू झाला. त्यानंतर 2019 पर्यंत या शोचे सहा सीझन आले. बॉलीवूड कलाकारांचे प्रोजेक्ट्स, त्यांच्यातील स्पर्धा, मैत्री- शत्रुत्व यासंदर्भातील हलक्याफुलक्या मुलाखतीचा हा लोकप्रिय शो आहे. करण जोहरच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर, त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होईल.