‘शेरलॉक होम्स’आपला मित्र बनतो!

गीतकार-कवी संदीप खरे यांच्या आवाजात ‘शेरलॉक होम्स’च्या गाजलेल्या रहस्यकथा आता स्टोरीटेलवर ऐकता येणार आहेत. दीर्घकाळ जगभरातील वाचकांना भुरळ घालणाऱ्या अजरामर कथा मराठीत ऑडिओ बुकच्या स्वरूपात येताना संदीप खरे यांच्याशी साधलेला संवाद

 ‘शेरलॉक होम्स’च्या कथां-बद्दल काय सांगाल?

‘शेरलॉक होम्स’ हे इतकं अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. त्याने माझ्या आयुष्यात खूप लहानपणीच प्रवेश केला आहे. भालबा केळकर यांनी अनुवादित केलेली ‘शेरलॉक होम्स’ची सर्व पुस्तके मी लहानपणी वाचली आहेत आणि जेव्हा हा प्रोजेक्ट करायचा असे मला स्टोरीटेलने सांगितले तेव्हा खूप आनंद झाला.  ‘शेरलॉक होम्स’ सर्वांना आवडतो, कारण तो आपला मित्र बनतो!

बालपणी तुमच्यावर ‘शेरलॉक होम्स’च्या कथांनी नेमकी कोणती छाप उमटवली होती?

मी मराठी मीडियममध्ये शिकलो आहे. त्यामुळे तसे इंग्लिश तेसुद्धा त्यांच्या एक्ससेन्ट कळणे शक्यच नव्हते आणि तरीही मी ‘शेरलॉक होम्स’ यांच्यावरील इंग्रजी मालिकेचे पाऊण तास-एक तासाचे एपिसोड पूर्ण खिळून पाहत बसलेला असे. बरं ते वय असं नव्हतं की, ज्या प्रकारची रहस्ये या कथेत सांगितली आणि ज्या प्रकारे त्याची उकल ‘शेरलॉक होम्स’ करतो ते कळावे इतके माझे वय नव्हते, परंतु टीव्ही मालिकेत दाखवलंय तसं त्यावेळेसचे ते लंडन,  त्याच्या बग्या,  दगडी रोड, कॉस्च्युम, धुकं मला टेरिफिक आवडायचं, अजूनही आवडते. यातील ‘शेरलॉक होम्स’ची चतुराई, त्याची रुबाबदार छबी, तीक्ष्ण नजर, अफाट बुद्धिमत्ता याची छाप पडली.

मूळ ‘शेरलॉक होम्स’मधील गंमत अनुवादित कथांमध्ये कशी आली आहे?

‘शेरलॉक होम्स’च्या मूळ कथांचे  अनुवाद तसं पाहिलं तर अतिशय सोप्यासहज भाषेमध्ये आहे. त्यामुळे ओरिजनल कथांप्रमाणेच मराठीतील अनुवाद-भाषांतरही खूप इंटरेस्टिंग झालाय आणि तुम्ही एकदा हे ऐकायला-वाचायला लागला की, कधी पकड घेतली जाते, तुम्ही त्या कथेत केव्हा रमता हे कळत नाही. कथा जरी त्याकाळची असली तरी ती क्लिष्ट भाषा नक्कीच नाही. त्यामुळे मला नाव वाचताना फार गंमत येत गेली.