डुकराचे मांस शिजवण्यावरून राडा, दोघींनी मिळून तरूणीला बदडले

1504

एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये नुकत्याच नोकरीला लागलेल्या एका तरुणीला दोन तरूणींनी मिळून जाम बदडले आहे. ही घटना कर्नाटकातील सदाशिवनगरात घडलेली आहे. तरुणीला मारहाण करणाऱ्या दोघींनी तिला पोलिसांसमोरच भोसकून ठार मारू अशी धमकीही दिली होती.

शायमा झमान ही विंडसर मॅनोर या हॉटेलमध्ये कामाला लागली होती. 10 मार्च हा तिचा नोकरीचा पहिला दिवस होता. हॉटेल व्यवस्थापनाने तिची राहण्याची व्यवस्था एका फ्लॅटमध्ये केली होती. तिथे याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या इतर तरूणीही राहात होत्या. शायमासोबत तिची मैत्रिण मुमताजही होती. लॉक़ाऊनमुळे मुमताज चेन्नईला तिच्या घरी परत गेली, त्यामुळे शायमा आणि अन्य दोन तरूणी या फ्लॅटमध्ये राहात होत्या.

शायमासोबत राहणाऱ्या तरुणींची नावे लालदुहसाकी आणि रमन जोटी अशी आहेत. शायमाने रमझान असल्याने रोजा पाळला होता. या काळात ती जेवण बनवायची नाही कारण ती फक्त फळं आणि दूधाचा आहारच घेत होती. इथूनच वादाची ठिणगी पडली. लालदुहसाकी आणि रमन यांनी फ्लॅटचे किचन फक्त त्यांच्यासाठीच वापरायला सुरुवात केली, शायमाचे रोजे असताना लालदुहसाकीने डुकराचं मांस घरी आणून शिजवलं होतं. शायमाने म्हटलंय की ‘मला याबाबत काहीच तक्रार नव्हती, मात्र या दोघींनी हे मांस फ्रीजमध्ये मी भाज्या आणि फळं ठेवत होते तिथे ठेवायला सुरुवात केली, जे मला पसंत पडलं नाही’ यावरून शायमा आणि इतर दोघींमध्ये भांडण सुरू झालं, दोघींनी मिळून शायमाला मारायला सुरुवात केली. शायमाने व्हिडीओ चित्रीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा फोन हिसकावून फेकून दिला.

शायमाने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि हॉटेलच्या मनुष्यबळ विकास कार्यालयाला कळवलं, त्यांनी शायमाला तक्रार करू नये असा सल्ला दिला. शायमा सगळं संपवून फ्लॅटवर परतली तेव्हा पुन्हा भांडणाला सुरुवात झाली. शायमाने पोलिसांना 100 नंबर फिरवून बोलावून घेतले. पोलिसांनी लालदुहसाकी आणि रमन यांना कडक शब्दात ताकीद दिली आणि शायमाला दुसऱ्या जागेत जाण्यासाठी सुचवलं. शायमाने सामान गोळा करून दुसऱ्या जागेत जाण्यासाठी कोणाला तरी सोबत द्या अशी पोलिसांना विनंती केली होती. शायमासोबत पोलिसांनी एक महिला पोलीस हवालदार आणि अन्य दोन पोलीस कर्मचारी दिले होते. शायमा फ्लॅटमध्ये जाताच लालदुहसाकीने हातात सुरी घेतली आणि शायमावर हल्ला करण्यासाठी धावली. सुदैवाने महिला पोलीस हवालदाराने मध्यस्थी केली, ज्यामुळे शायमाला किंवा अन्य कोणालाही इजा झाली नाही. बंगलोर मिरर या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत म्हटलंय की शायमाने लालदुहसाकी आणि रमन जोटीविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या