विशेष सुरक्षा दलाचा प्रमुख असल्याचे सांगून चौघांना ८८ लाखांचा गंडा

सामना ऑनलाईन । ठाणे

पंतप्रधानांना सुरक्षा पुरविणाऱ्या विशेष सुरक्षा पथकाचे प्रमुख असल्याचे भासवून चौघांना ८८ लाखांचा गंडा घालणाऱ्या एका पोलीस हवालदाराला कासारवाडवली पोलीसांनी अटक केली आहे. अनंतप्रसाद पांडे असे त्या हवालदाराचे नाव असून तो नालासोपारा येथे राहतो. पांडे याने याव्यतिरिक्त किती जणांना फसवले आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

डिसेंबर २०१६ मध्ये अनंतप्रसाद यांची इन्श्युरन्स कंपनीमधील चार व्यक्तींशी एका मित्रामुळे ओळख झाली होती. पांडे यांनी त्यांना त्यांची मंत्रालयात चांगली ओळख असल्याचे त्या सर्वांना पटवून दिले होते. त्यातील एकाला बार सुरू करायचा होता त्यासाठी लिकर लायसन्स हवे होते, दुसऱ्या व्यक्तीला म्हाडाच्या इमारतीतील दुकानाचा गाळा हवा होता. तिसऱ्या व्यक्तीला रेल्वे स्थानकावर स्टॉलचे परमिट हवे होते, तर चौथ्या व्यक्तीला रेल्वेत टीसी म्हणून नोकरी हवी होती. या चौघांकडूनही पांडे यांने ८८ लाख रुपये घेतले होते. मात्र पैसे देऊनही काम होत नसल्याचे बघून या चौघांनीही पांडेकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला होता. पांडेने त्यांचे तीन लाख रुपये परत केले व इतर पैसे देतो असे सांगून तो टाळाटाळ करत होता. त्यामुळे या चौघांनीही त्याच्याविरोधात कासारवडवली पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पांडे याला नालासोपरा येथील घरातून त्याला अटक केली.

अटक केल्यानंतर अनंतप्रसाद पांडे याला जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आले होते. न्यायदंडाधिकारी आर.टी इंगळे यांनी त्याची सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे, असे पोलीस निरीक्षक नासिर कुलकर्णी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या