कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी ‘पोस्ट-कोविड पुनर्वसन क्लिनिक’

कोरोना आजारातून बरे होऊन घरी परतल्यानंतर अनेक जणांना विविध शारीरिक व मानसिक विकारांचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन परळ येथील ग्लोबल रुग्णालयाने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी आता ‘पोस्ट-कोविड पुनर्वसन क्लिनिक’ सुरू केले आहे.

ग्लोबल रुग्णालयातील कन्सल्टंट इंटेन्सिव्हिस्ट आणि छातीरोगतज्ञ डॉ. हरीश चाफले म्हणाले की, ‘कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्येही काही महिन्यांनंतर थकवा जाणवणं, खोकला व सर्दी, श्वास घेण्यास अडचण येणे अशा तक्रारी दिसून येत आहेत. त्यामुळे फुफ्फुसातील फायब्रोसीसची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे.’
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी हे क्लिनिक एक वरदान आहे. कोविडमधून बरे झालेल्या अनेक रुग्णांमध्ये थकवा, ताप, डोकेदुखी, कोरडा खोकला आणि छातीत दुखणे अशी लक्षणं दिसून येत आहेत. याशिवाय स्नायू दुखणे, अशक्तपणा, पुरळ उठणे, तीव्र श्वसन त्रास सिंड्रोम (एआरडीएस), न्युमोनिया, चिंता, नैराश्य आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असा त्रासही अनेक लोकांमध्ये पाहायला मिळतोय. अशा रुग्णांना मदत करण्यासाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आले असल्याचे रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (मुंबई) डॉ. विवेक तलौलीकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या