मुस्लिमविरोधातील ‘त्या’ पोस्टर्समुळे यूपीमध्ये तणाव

45

सामना ऑनलाईन । बरेली

‘उत्तर प्रदेशात भाजप सरकार आलं आहे, आता अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जशी वागणूक देतात तशीच वागणूक इथल्या मुस्लिमांना मिळणार’, अशी पोस्टर्स यूपीत झळकली आणि अनेक भागात तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून तशी पोस्टर्स तात्काळ काढण्याचे आदेश देण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर बरेलीपासून ७० किमीवर असणाऱ्या जियागानला गावातील भिंतीवर ही पोस्टर लावण्यात आली आहेत. या पोस्टरमध्ये लिहिलंय की, अमेरिकेत मुस्लिम समाजाबाबत ट्रम्प यांनी जे धोरण राबवलं आहे तेच आता इथेही राबवलं जाईल. कारण आता उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आली आहे. या पोस्टरवर भाजपाच्या एका खासदाराचं नाव छापण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये असंही लिहण्यात आलं आहे की, मुस्लिमांनी लवकरच हे गाव सोडून द्यावं अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील. जियागानला गावची लोकसंख्या २५०० असून मुस्लिमांची संख्या २०० च्या आसपास आहे. या पोस्टरमुळे गावात मुस्लिम समाजात घबराट पसरली आहे.

पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सर्व पोस्टर काढून टाकली. सोमवारी पहाटे गावकऱ्यांनी हे पोस्टर पाहिल्याचं गावचे सरपंच रेवा राय यांनी सांगितलं. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच गावातील ८ ते १० युवकांना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या