नव्या विचारांचा जलसा

502

<डॉक्टर गणेश चंदनशिवे>

अनेक लोककलावंतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपल्या लोककलेतून प्रबोधन केले.

खुळचट रूढी, अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, धर्मांधता, कर्मकांड, उच्चनीचता, जातीयवाद, स्त्री-पुरुष भिन्नता या सामाजिक विषमतेच्या विरोधात बंड उभारून तथाकथित मनुवादी विचारसरणीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धडा शिकवला. मग तो महाडच्या चवदार तळय़ाचे पाणी प्राशन आंदोलन असो की काळाराम मंदिरात प्रवेश असो, महिलांचे प्रश्न असतील, तमाम बहुजन दलित ओबीसींचे हक्क असतील, बाबासाहेबांनी या सर्वच हक्कांसाठी परिवर्तनवादी लढा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली उत्तर प्रदेशातील महू येथे रामजी संकपाळ व सुभेदार यांच्या घरी झाला. बाबासाहेबांच्या परिवर्तनवादी विचाराने प्रेरित होऊन हजारो कार्यकर्ते, समाजसुधारक आणि लोककलावंत आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित झाले. तमाशासारख्या निखळ रंजनासाठी उदयाला आलेल्या कला प्रकाराचा आधार घेत भाऊ फक्कड ऊर्फ भाऊ मालोजी भंडारे यांनी आपला तमाशाचा फड बंद करून आंबेडकरी विचारांचा प्रचार, प्रसार आंबेडकरी जलशाद्वारे तळागाळातील दलित समाजाने केला.

हे भीमराया रामजी तनया द्यावी

मज मती आज तव गुण गाया

तमाशातील गवळणीला छेद देऊन मावशी हे पात्र जलशात कायम राहिले ते सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करायचे, सूत्रधार साथीदार दुफळीवर मार्मिक भाष्य करायचे आणि बाबासाहेबांचे ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा परिवर्तनवादी विचार गावगाडय़ात पोहोचवायचे. डॉ. आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला लंडनला गेले. तिथे स्पृश्य-अस्पृश्य समाजाचे काय म्हणणे आहे याची मांडणी कशी केली यावर शा. केरूबा हेगडे यांनी एक कवन केले ते असे-

अरे महाराचं पोर बिटय़ा लय हुशार

साऱया जगात असं नाही होणार

गव्हर्नर व्हाईसराय गोरा अधिकारी

त्याच्यासंगे गॉट मॅट बोलतया भारी

विंग्लिश साहेबावाणी घालून  विजार

अरे महाराचं पोर बिटय़ा लय हुशार

आंबेडकरांनी भीमराव कर्डकांचे एक कवन ऐकून असे उद्गार काढले की, माझ्या दहा भाषणांची बरोबरी शाहिरांचे एक कवन करू शकते. इतकी ताकद या लोककलावंतांच्या शाहिरीत आहे. पुढे बाबासाहेब गेले आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची फाटाफूट व्हायला सुरुवात झाली. तेव्हा वामदादा कर्डकांनी एक रचना केली ती अशी-

वाणीत भीम आहे, करणीत भीम असता

भीमा, तुझ्या मताचे जर पाच लोक असते

जलसे प्रभावहीन झाली, चळवळी दिशाहीन झाल्या , मात्र शाहीर लोककलावंत डगमगला नाही. जलशाची जागा भीम गीत पार्टीने घेतली. यात वामदादांचे समकालीन प्रल्हाद शिंदे, विठ्ठल शिंदे, कृष्णा शिंदे, विठ्ठल उमप, प्रतापसिंग बोदडे यांनी कंबर कसली. हातात डफ, खंजिरी घेऊन आंबेडकरी प्रबोधनाचे विचार घेऊन ते गाऊ लागले. शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात-

जग बदल घालुनी घाव

सांगून गेले मला भीमराव

पुढे जलसे पाटर्य़ांची जागा कव्वाल्यांनी घेतली आणि जगाबरोबर शाहिरांनीसुद्धा कूस बदलली. आपल्या पूर्वजांचा वारसा पुढे चालवत आज नागसेन सावदेकर, डी. आर. इंगळे, विष्णू शिंदे, सुरेश शिंदे, आनंद मिलिंद, दिनकर शिंदे, नंदेश उमप हे आज आंबेडकरी रचनांद्वारे समाजाचे प्रबोधन करीत  आहेत. अन्यायाविरुद्ध लेखणी हेच शस्त्र् हातात घेऊन समाजहित जोपासणे हेच मूळ लोककलावंतांचे काम आहे. म्हणून बाबासाहेबांचा संदेश डोळय़ांपुढे ठेवला पाहिजे    तो असा –

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करील तो

गुरगुरल्याशिवाय राहणार नाही

आपली प्रतिक्रिया द्या