‘पावर ब्लॅकआऊट’मुळे पाकिस्तान अंधारात; रडारड करत हिंदुस्थानवर केले आरोप

नव्या पाकिस्तान निर्मितीचे आश्वासन देत इमरान खान सत्तेत आले होते. मात्र, त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तानची अवस्था आणखी बिकट झाली आहे. पाकिस्तानात शनिवारी रात्री अचानक पूर्ण देशातील वीज गायब झाली. संपूर्ण देश अंधारात बुडाला. कराची, लाहोर, पेशावर, इस्लामाबाद, मुल्तान, रावळपिंडी ही प्रमुख शहरेही अंधारात बुडाली. पाकिस्तानने नेहमीप्रमाणे रडारड करत याचे खापर हिंदुस्थानवर फोडले आहे. तसेच हिंदुस्थानवर हास्यास्पद आरोपही केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे पुन्हा एकदा हसे झाले आहे.

पाकिस्तान अंधारात बुडाल्यानंतर इमरान खान सरकारमधील वाचाळवीर मंत्री शेख रशीद यांना या पाकिस्तानातील अंधारात हिंदुस्थानचा हात असल्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी नेहमीच्या पंरपरेप्रमाणे रडारड करत हिंदुस्थानवर याचे खापर फोडले आहे. हिंदुस्थानात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून जगाचे लक्ष हटवण्यासाठी हिंदुस्थानने पाकिस्तानची वीज घालवल्याचा हास्यास्पद आरोपही त्यांनी केला आहे.

पाकिस्तानच्या या आरोपांमुळे त्यांचे हसे होत असल्याने उर्जा मंत्रालयाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. पावर ट्रान्समिशनची फ्रिक्वेंसी अचानक 50 वरून 0 वर आल्याने देशभरात पावर ब्लॅकआऊट झाल्याचे उर्जा मंत्रालयाने म्हटले आहे. शनिवारी रात्री 11.41 वाजण्याच्या सुमारास हा तांत्रिक बिघाड झाल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. तसेच नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशभरात टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.

राजधानी इस्लामाबादमध्ये अंधार परसल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. त्यामुळे उपायुक्त हमजा शफकत यांनी ट्विट करत तांत्रिक बिघाडामुळे ब्लॅकआऊट झाला आहे. लवकरच दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत होईल, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानात देशभरात ब्लॅकआऊट झाल्याने तेथील सोशल मिडीयावर #blackout ट्रेंड होत होता. याआधीही काहीवेळा तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानात ब्लॅकआऊट झाला होता. त्यावेळीही सोशल मिडीयावर याची चर्चा रंगली होती. मात्र, या घटनेत पाकिस्तानने हिंदुस्थानवर हास्यास्पद आरोप केल्याने त्यांचे हसे होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या