एशियाड पॅसिफिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप; गौरव, रोहिणी यांना सुवर्ण पदक

82

सामना ऑनलाईन । पुणे

गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) येथे नुकत्याच झालेल्या एशियाड पॅसिफिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत (क्लासिक इक्विविष्ट) गौरव घुले आणि रोहिणी बन्सल या पुण्यातील खेळाडूंनी हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून दिले. मराठमोळ्या गौरव घुलेने एकूण 692.5 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर मोहर उमटवली, तर रोहिणी बन्सल हिने एकूण 340 किलो वजन उचलून सोनेरी यश संपादन केले. पुण्याच्याच दीपा लुंकड हिनेही देशाला रौप्यपदक जिंकून दिले.

गौरव घुलेने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्याचे वडील गणेश खुले व प्रशिक्षक मोनीष राजिवडे उपस्थित होते.  गौरवने या स्पर्धेत पुरुषांच्या 93 किलो वजनी गटात बेंचप्रेस (172.5 किलो), स्कॉट (235 किलो) व डेडलिफ्ट (285 किलो) असे एकूण 692.5 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर मोहर उमटवली. न्यूझीलंडच्या ब्रहाकॉमल पॅरिंटोने रौप्य, तर यजमान ऑस्ट्रेलियाच्या विएट मेर्लीन याने कास्यपदकाची कमाई केली. महिला गटात हिंदुस्थानच्या रोहिणी बन्सल हिने 72 किलो गटात ब्रेंचप्रेस (65 किलो), स्कॉट (125 किलो) व डेडलिफ्ट (150 किलो) असे एकूण 340 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. नौरू देशाची जियोमी फ्रीज रौप्यपदकाची मानकरी ठरली. रोहिणीला या स्पर्धेतील बेल्स लिफ्टरचा दुसरा क्रमांक देऊन गौरविण्यात आले.

अन् स्वतःतील पॉवरचा झाला साक्षात्कार!

ऍमेनोरा मॉलमध्ये 2016 मध्ये झालेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गमतीने सहभागी झालेल्या गौरव घुलेने थेट प्रथम क्रमांक पटकावला. या जेतेपदामुळे गौरवला या खेळाबद्दल आकर्षण निर्माण झाले. मग 2017 मध्ये गौरवने कुठलाही सराव नसताना आणि पॉवरलिफ्टिंगसाठी कुठला कॉश्च्युम पाहिजे याचे ज्ञानही नसताना केवळ ताकदीच्या जोरावर थेट सुवर्णपदकावर कब्जा केला. या सुवर्णपदकामुळे आपल्यामध्ये पॉवरलिफ्टिंग खेळासाठी लागणारी ‘पॉवर’ नैसर्गिकच असल्याचा साक्षात्कार गौरव घुलेला झाला. मग या गडय़ाने मोनीष राजिवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा रोडवरील गोल्ड जिममध्ये पॉवरलिफ्टिंगचे धडे गिरवायला सुरुवात केली. या खेळासाठी अंगात लागणारी रग जन्मजात लाभलेल्या गौरवने मागील दोन वर्षे सलग जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पॉवरलिफ्टिंगमध्ये स्वतःची ‘पॉवर’ निर्माण केली. सप्टेंबर 2018मध्ये लखनौ येथे झालेल्या नॅशनल सीनियर मेन क्लासिक अन इक्विविष्ट पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदकाला गवसणी घातली. या सोनेरी कामगिरीच्या जोरावर गौरवची आशियाई चॅम्पियनशिपसाठी हिंदुस्थानच्या संघात निवड झाली.

आता मिशन वर्ल्ड चॅम्पियनशिप!

‘ऑस्ट्रेलियातील सुवर्णपदकामुळे आनंद होणे सहाजिकच आहे, पण आता माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. स्विडन येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत माझी हिंदुस्थानच्या संघात निवड झाली आहे. येथे मला रशियन पॉवरलिफ्टर्सकडून
कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे, मात्र या स्पर्धेतही देशाला सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी मी नक्कीच जिवाचे रान करीन.  एकूण 700 किलोहून अधिक वजन उचलण्याची तयारी करूनच मी स्विडनच्या स्वारीवर जाईन’.

 गौरव घुले

आपली प्रतिक्रिया द्या