मुंबईतील एकाही ग्राहकाचा वीज मीटर कापू नका, ऊर्जामंत्र्यांचे आदेश

1004

वीज कंपन्यांनी पाठवलेली वीज बिले पाहून ग्राहकांना प्रचंड मोठा शाँक बसला आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण अधिकारी नेमावे, वीज बील तीन हफ्त्यात भरण्याची ग्राहकांना सवलत द्यावी, त्यावर कोणतेही व्याज आकारण्यात येऊ नये आणि एकाही वीज ग्राहकाची वीज कापू नका असे आदेश आज उर्जामंत्री डाँ. नितीन राऊत यांनी आज वीज कंपन्यांना दिले. त्यामुळे मुंबईतल्या वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊननंतर मुंबईतल्या वीज ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या वीज बिलांमुळे ग्राहकांना प्रचंड धक्का बसला आहे. वीज कंपन्यांच्या विरोधात सर्व सामान्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. या नाराजीची दखल घेत मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सुचनेनुसार मुंबई व परिसरातील वाढीव वीज बिलांच्या संदर्भात उर्जामंत्री डाँ. नितीन राऊत व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. या बैठकीला प्रधान सचिव, ऊर्जा, तसेच अदानी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कंदर्प पटेल,, टी अँड डी टाटा पॉवर चे जोगळेकर, बेस्ट चे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे तसेच एम् एस ई बी, व इतर संबंधित अधिकारी होते.

अदानीच्या विरोधात तक्रार

यावेळी आमदार सुनील प्रभू यांनी अदानी कंपनीकडून होणा-या लुटीकडे सरकारचे लक्ष वेधले. मार्चनंतर वीज ग्राहकांच्या बीलामध्ये भरमसाठ वाढ केली आहे. ग्राहकांना दुप्पट रक्कमेची बीले पाठवली आहे. या बैठकीत सुनील प्रभू यांनी बीलेही सादर केली. मार्चमध्ये ग्राहकाला २९० रुपये बील आले. जूनमध्ये ३ हजार ८५० रुपये आले येवढे बील कसे येते असा संतप्त सवाल प्रभू यांनी केला. वाढीव बिलांबाबत ग्राहकांनी विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळतात याकडे प्रभू यांनी लक्ष वेधले.

ग्राहकांना दिलासा

सामान्यांवर अतिरिक्त वीज बिलाचा भार पडू नये यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व महाराष्ट्र वीज नियामक मंडळ प्रयत्नशील असून लवकरच वीज ग्राहकांना दिलासा मिळेल अशी माहिती उर्जा मंत्री नितीन राऊत व परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

उपनगरातील वीज ग्राहकांच्या वतीने शिवसेना विलास पोतनीस, सुनील प्रभू, प्रकाश सुर्वे, संजय पोतनीस, दिलीप लांडे, अजय चौधरी,रमेश कोरगांवकर, मनीषा कायंदे, यामिनी जाधव यांनी अदानी समुहाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी कंदर्प पटेल यांना निवेदन देऊन उपनगरातील वीज ग्राहकांना त्वरित दिलासा द्यावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या