पोलीस डायरी – मस्तवाल राजकारणी आणि लाचार पोलीस

>> प्रभाकर पवार

विद्येचे नव्हे आता संघटित गुंड टोळ्यांचे माहेरघर बनलेल्या पुणे शहरात रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास अशोक चौकात (डोके तालीमजवळ) राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी नगरसेवक वनराज बंडू आंदेकर (४०) यांची दुचाकीवरून आलेल्या 10 ते 12 गुंडांनी अग्निशस्त्रातून गोळ्या झाडून व कोयत्याचे वार करून अत्यंत निर्घणपणे हत्या केली. ही हत्या मालमत्तेच्या वादातून वनराज आंदेकर यांच्या कुटुंबीयांनीच सुपारी देऊन घडवून आणल्याचे तपासात उघड झाले आहे.

वनराज आंदेकर यांच्यावर 5 गोळ्या जरी झाडण्यात आल्या असल्या तरी वनराज यांचा मृत्यू हा कोयत्याचे सपासप वार केल्यानेच झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कोयता गँगची पुणे शहरात पुन्हा एकदा प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. पुण्यात कोयता विक्रीवर दुकानदारांना बंधने असताना आरोपींकडे धारदार कोयते येतात कुठून, असा सवाल करण्यात येत आहे. वनराज यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी वनराज यांचे सख्खे मेहुणे जयंत लक्ष्मण कोमकर (52), गणेश लक्ष्मण कोमकर (37) यांना अटक केली आहे. वनराज आंदेकर हा सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर यांचा मुलगा असून बंडू यांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलिसांनी अलीकडे बंडूवर ‘मोक्का’ची कारवाई केली होती. अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आंदेकर कुटुंबीयांनी एकमेकांवर मालमत्तेच्या वादातून शस्त्र उगारल्याने पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यापूर्वीही पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील संजय काळे, सतीश मिसाळ, संदीप बांदल या नगरसेवकांच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर रविवारी वनराज बंडू आंदेकर या नगरसेवकाची हत्या करण्यात आली. पुण्यात गजानन मारणे, गणेश निवृत्ती मारणे, वनराज बंडू आंदेकर नीलेश घायवळ व आंदेकर टोळीची दहशत असून पुणे पोलिसांना या टोळ्या संपविण्यात पूर्णपणे अपयश आलेले आहे. आता तर कोयता गँगचे नवीन नवीन गुंड पुण्यात पोलिसांवरही हल्ले करू लागले आहेत. गेल्याच आठवड्यात पुण्यात रत्नदीप गायकवाड या पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आला. एकेकाळी विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता कुणीही सुरक्षित नाही पैशांसाठी तेथे कोयत्याने अल्पवयीन मुलांवरही हल्ले केले जात आहेत. महिला तर पूर्णपणे असुरक्षित आहेत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे पूर्णपणे तीनतेरा वाजले आहेत. हे मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर सिंधुदुर्गातही दिसून आले आहे.

एकेकाळी दारू, मटक्याचे धंदे असलेल्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मनी व मसल पॉवर असलेल्या आंदेकर कुटुंबीयांना राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी मोठे केले. पदे देऊन निवडणुकीत निवडून आणले. आंदेकर कुटुंबातील 6 सदस्य पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्या आंदेकर कुटुंबातील एका महिलेला महापौरही करण्यात आले. तेच कुटुंब आज एकमेकांच्या जिवावर उठले आहे. प्रमाणापेक्षा अधिक पैसा आला की, माणसामध्ये अहंकार, क्रोध, अरेरावी वाढते. सिंधुदुर्गात सध्या तेच सुरू आहे. गडगंज संपत्ती, पैसा असलेले एक सत्ताधारी, राजकारणी कुटुंब शासकीय अधिकाऱ्यांना, प्रशासनाला, पोलिसांना कामच करू देत नाही. आम्ही सांगू तेच करायचे. न केल्यास तुमची बदली केली जाईल. बायकोला संपर्कही साधता येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला पाठविले जाईल. आमच्या वाटेला जाल तर घरात घुसून ठार मारू ही सारी धमकी थेट टीव्ही चॅनेलसमोर तेथील खासदार, आमदार यांनी विरोधकांना, पोलिसांना दिली आहे. त्यामुळे बंदोबस्तासाठी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तैनात करण्यात येणाऱ्या पोलिसांची महाराष्ट्रातील या जनतेला कीव येऊ लागली आहे इतके लाचार पोलीस याआधी कुणी पाहिले नव्हते. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसी ब्रीद वाक्य पोलीस ठाण्यातून हटवले पाहिजे असे आता लोक उघडपणे बोलू लागले आहेत. राजकारण्यांची, सत्ताधाऱ्यांची ही मस्ती मनी व मसल पॉवरची आहे. त्यामुळेच ते आज पोलिसांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यांच्याशी उर्मटपणे बोलत आहेत. वास्तविक सिंधुदुर्गात गेल्या आठवड्यात आजी-माजी खासदारांनी पोलिसांना धमकी दिल्यानंतर पोलिसांनी खासदारांविरोधात एफआयआर दाखल करायला हवा होता. त्यांना तो अधिकार होता. कॅमेऱ्यामध्ये आजी-माजी खासदारांचे गैरवर्तन कैद झाले होते. परंतु राज्य पोलिसांच्या प्रमुखपदी एखाद्या “कार्यकर्ती” अधिकारी महिलेलाच आणून बसविले असेल तर त्या सामान्य पोलीस अधिकाऱ्याचे तरी कोण ऐकणार? असो, कधी नव्हे इतके पोलिसांना लाचार, हतबल करण्याचे काम सध्याच्या सरकारने केले आहे. केवळ पब्लिसिटीसाठी सिंधुदुर्गातील आजी- माजी खासदार व आमदारांकडून पोलिसांचा रोज अपमान केला जात आहे.

गेल्या आठवड्यात मालवण राजकोट किल्ल्यावर जो ‘राडा’ झाला त्या वेळी एका पोलीस अधिकाऱ्यावर एक अहंकारी, क्रोधी माजी खासदार ज्या पद्धतीने अंगावर चाल करून जात होता, उर्मटपणे त्याच्याशी बोलत होता. त्या वेळी त्या अधिकाऱ्याची झालेली केविलवाणी अवस्था व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लाखो लोकांनी पाहिली आणि संताप व्यक्त केला. इतका मस्तवालपणा कधी कुणी पाहिला नव्हता. सध्याचे राज्य सरकार पोलिसांना षंढ बनवीत आहे. पुढील पिढीसाठी हे धोक्याचे आहे. पोलिसांची भीती कुणाला राहिलेली नाही म्हणूनच आमच्या आया-बहिणींवर दिवसाढवळ्या लैंगिक अत्याचार, बलात्कार होत आहेत. इतके दुर्बल सरकार कधी कुणी पाहिले नव्हते तेव्हा जनहो, हे राज्य आपले नाही तर मनी व मसल पॉवर असलेल्या सैतानांचे आहे एवढे नक्की.

पुण्यातील आंदेकर टोळीचा कुटुंबीयांचा 40 वर्षांपासूनचा रक्तरंजित इतिहास आहे आज तेच अस्त्र त्यांच्यावर उलटले आहे. सिंधुदुर्गातील ‘राडा’ संस्कृती पोसणाऱ्या कुटुंबियांचेही उद्या तेच होणार आहे. नियती कुणाला सोडत नाही.

[email protected]