प्रभाकर वाईकर

>> विशाल अग्रवाल

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा शाहीर प्रभाकरराव वाईकर यांच्या निधनाने सर्वोदयी कार्याचा प्रवास थांबला आहे. प्रभाकर वाईकर हे मूळ जिंतूर तालुक्यातील चारठाण्याचे. त्यांचे हैदराबाद मुक्तिसंग्राम, सर्वोदय मंडळ, राष्ट्रसेवा दल, खादीचा प्रचार, प्रसार, महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये वैचारिक प्रबोधन असे मोठे कार्य आहे. सर्वोदय मंडळाची राष्ट्रीय पातळीवरील सभा-संमेलने, अधिवेशने यांच्या उद्घाटन समारंभात स्वातंत्र्यसैनिक वाईकर यांच्या पहाडी, शाहिरी प्रेरणा गीताने सुरुवात व्हायची. विविध प्रांतात पार पडलेल्या सर्वोदय संमेलनात उद्घाटनप्रसंगी वाईकरांची स्फूर्तिगीते सर्वोदय कार्यकर्त्यांना उत्साहित करून जाणारी ठरत. राष्ट्रसेवा दलामध्ये साने गुरुजी यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करताना शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठ्य़ा प्रमाणात साने गुरुजी यांच्या आवडत्या ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’, या स्फूर्तिगीताने राष्ट्रप्रेमाची ज्योत जागृत केली. ती आजही विद्यार्थी, तरुणांमध्ये तेवत आहे. त्यांनी राष्ट्रसेवा दलात कार्यरत राहून संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचा एक संच करून शाहिरी गाजविली.

पंजाबमध्ये अमृतसर येथील गुरुद्धारामध्ये आपल्या पहाडी आवाजातून राष्ट्रभाषेत भाविकांचे प्रबोधन केले. काही वर्षांपूर्वी परभणीत राष्ट्रसेवा दलाचे अधिवेशन पार पडले. त्यात चढत्या वयातही व्यवस्थापन आणि संचालन समितीमध्ये तरुणांना लाजवेल असा पुढाकार घेऊन वाईकरांनी हे अधिवेशन यशस्वी केले. कै. गोविंदभाई श्रॉफ, कै. विनायकराव चारठाणकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसाद अग्रवाल यांच्यासारख्या थोर विचारवंतांचा त्यांना सहवास राहिला. महात्मा गांधी यांच्या आवाहनानुसार ‘चले जाव’ आंदोलनात उडी घेतल्यानंतर हैदराबाद मुक्तिसंग्राम, स्वातंत्र्योत्तर काळात सर्वोदय मंडळ, खादीचा प्रचार-प्रसार, व्यसनमुक्ती, तरुण-तरुणींचे प्रबोधन असे उपक्रम ते आयुष्यभर राबवत राहिले. आता २३ ते २५ फेबुवारीदरम्यान वर्धा जिह्यातील सेवाग्राम आश्रमात यंदा २०१८ चे ४७ वे अखिल भारतीय पातळीवरील सर्वोदय समाज संमेलन होऊ घातलेले आहे. त्या संमेलनात उद्घाटनप्रसंगी वाईकरांच्या पहाडी आवाजातील स्फूर्तिगीतांची कमतरता निश्चितच भासेल.

आपली प्रतिक्रिया द्या