
जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मिशन गगन भरारी कार्यक्रमाअंतर्गत अमेरिका येथील नासा वैज्ञानिक सेंटरला भेट देण्यासाठी अभ्यास दौऱ्याकरिता मंडणगड तालुक्यातील कोन्हवली या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी प्रभुती संतोष घागरुम हिला तालुक्याच्या वतीने मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी शुभेच्छा दिल्या.
मंडणगड या डोंगरी भागातील अति दुर्गम आणि पायाभूत सोयी सुविधांपासून आजवर मागास राहिलेल्या तालुक्यातील कोन्हवली गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या प्रभुती घागरूम हिची नासा अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. त्यामुळे ती जिल्हयातील इतर विद्यार्थ्यांच्या सोबत अमेरिकेला निघाली आहे. नासा अभ्यास दौ-यासाठी निघालेल्या प्रभुती घागरूम हिचे मंडणगड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन तिला शुभेच्या दिल्या. यावेळी प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक शांताराम पवार, शिक्षक भिकू बोर्ले, कोन्हवली शाळेच्या शिक्षिका विद्या पवार आणि तिची आई उपस्थित होत्या. जिल्ह्यातील एकूण 9 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी हा शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.