नोकरी अन् नाटक कधीही सोडू नकोस! प्रदीप पटवर्धन यांनी आईचा शब्द अखेरपर्यंत पाळला

प्रदीप पटवर्धन यांनी एका मुलाखतीत नृत्याच्या आवडीबद्दल सांगितले होते. त्यात ते म्हणाले, ‘त्यावेळी गोविंदा खूप उत्साहात व्हायचा. शोभायात्रा असायच्या. गोविंदामध्ये नाचणे ही एक गंमत होती. आमच्या गोविंदामध्ये मी अगदी सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नाचायचो. झावबावाडीचा गोविंदा निघाला की, ‘पटय़ा’ नाचतोय म्हटल्यावर गर्दी जमायची. आमचा गोविंदा गिरगावात पोहोचायचा तेव्हा मला पाहायला पेडर रोडवरून लोक यायचे.’ याचसंदर्भात एक आठवण अभिनेत्री-लेखिका वसुंधरा साबळे यांनी सांगितली आहे. ‘प्रदीपला नृत्याची आवड होती. म्हणूनच आमच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’मध्ये ‘आठशे खिडक्या नऊशे दारं…’साठी त्याची वर्णी लागली. त्याने त्याचे अक्षरशः सोने केले. त्याच्यासारखा डान्स कुणीच करू शकले नाही.’

आमचा सुपरस्टार आम्हाला सोडून गेला

आमची कॉलेजपासूनची मैत्री. सतीश पुळेकर आमचे गुरू. आम्ही सर्व हौशी कलाकार ‘अतरंग’ या संस्थेच्या माध्यमातून एकत्र जोडले गेलो. पूर्वी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये विनय आपटे, विजय सोहोनी, प्रकाश बुद्धिसागर, अरुण नलावडे या दिग्गजांचा दबदबा असायचा. आमच्या वेळेपासून कॉमेडी नाटकांना बक्षीस मिळू लागली. मी प्रदीपसोबत ‘बायको असून शेजारी’ नाटकाचे 562 प्रयोग केले. काही चित्रपटांतही एकत्र काम केले. फक्त विनोदी नाही, तर गंभीर भूमिकाही त्याने तितक्याच ताकदीने वठवल्या. आमच्यासाठी तो सुपरस्टारपेक्षा कमी नव्हता.

चांगला मित्र, उत्कृष्ट नट गमावला

1979-80 च्या दरम्यान प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, प्रशांत दामले आणि माझे करीअर एकत्रच सुरू झाले. मी आणि प्रदीप सिद्धार्थ कॉलेज आणि बँक ऑफ इंडियातही एकत्र होतो. 1981 साली द. मा. मिरासदार लिखित, सतीश पुळेकर दिग्दर्शित ‘माझी पहिली चोरी’ या एकांकिकेत प्रदीप आणि मी एकत्र काम केले होते. तिथूनच आमच्या मैत्रीच्या प्रवासाला सुरुवात झाली. मी दिग्दर्शित केलेल्या ‘केशवा माधवा’ नाटकात आणि ‘चष्मेबहाद्दर’ आणि ‘लावू का लाथ’ या चित्रपटात, ‘कॉमेडी डॉट कॉम’ मालिकेत प्रदीपने काम केले होते. गेल्याच आठवडय़ात पह्नवर आमच्यात आगामी प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करण्याविषयी चर्चा झाली. आणि आज त्याच्या निधनाची बातमी आली. एक चांगला मित्र, उत्कृष्ट नट आम्हाला कायमचा सोडून गेला.

पटय़ा, तुला खूप मिस करेन यार…! प्रशांत दामले झाले भावूक

प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे प्रशांत दामले भावूक झाले आहेत. सोशल मीडियावर आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, माझी आणि प्रदीपची जोडी होती. महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, चल काहीतरीच काय, वेगवेगळे चित्रपट, मालिका आम्ही एकत्र केल्या. 1978 ते 1982 ही सिद्धार्थ कॉलेजची पाच वर्षे प्रायोगिक रंगभूमी आणि 1 जानेवारी 1985 ते आजपर्यंत व्यावसायिक रंगभूमी अशी आमची 44 वर्षांची दोस्ती. या घनिष्ठ मैत्रीला आज पूर्णविराम मिळाला. ‘मोरूची मावशी’चे आमचे तुफानी दौरे व्हायचे. विजय चव्हाण, विजय साळवी, टाकळे, बिवलकर, वासंती निमकर, पटय़ा आणि मी अशी विविध वयोगटांतली नट मंडळी होती. त्यामुळे नुसता धुडगूस असायचा. खूप आठवणी आहेत, पण या क्षणाला शब्दांत मांडणे अत्यंत कठीण आहे. पटय़ा, तुला खूप मिस करेन यार!