दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन, वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन झाले आहे. प्रदीप यांनी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सरकार यांनी परिणीता, लागा चुनरी में दाग, मर्दानी आणि हेलिकॉप्टर ईला या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. ते दीर्घकाळापासून किडनीच्या समस्येचा सामना करत होते आणि त्यांचे डायलिसिसही सुरू होते. त्यांना रात्री 2.30 च्या सुमारास त्रास जाणवायला सुरुवात झाली. त्याच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी खूपच कमी झाली होती. त्यामुळे रात्री तीन वाजता त्यांना मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले आणि 3.30 वाजता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. आज दुपारी चारच्या सुमारास सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर प्रदीप यांचा फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी फोटो सोबत ‘प्रदीप सरकार दादा यांचे निधन झाले आहे’ या असं कॅप्शन दिलं आहे.

अभिनेता अजय देवगणनेही दिग्दर्शक प्रदीप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अजयने प्रदीप सरकार यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. दिग्दर्शकाच्या निधनाने सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. मनोज बाजपेयी यांनी देखील त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना केली आहे.