भगव्या जल्लोषात प्रदीप साळवींचा उमेदवारी अर्ज सादर

2123

भगवा जल्लोष, प्रचंड शक्तीप्रदर्शन करत रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी शिवसेनेकडून प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. रत्नागिरी नगर परिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार करत शिवसेना जिंदाबादच्या जोरदार घोषणा दिल्या.

रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 29 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. आज शिवसेनेकडून तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, आमदार राजन साळवी,उद्योजक रवींद्र सामंत, महाराष्ट्र क्रिकेट असो. सदस्य किरण सामंत, लोकसभा मतदारसंघ महिला संपर्कप्रमुख नेहा माने, महिला जिल्हा संघटक वेदा फडके, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, उपशहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सवांत, महिला शहर संघटक मनीषा बामणे सर्व नगरसेवक आणि पदाधिकार उपस्थित होते.

शिवसेनेचे उमेदवार प्रदीप साळवी यांनी सांगितले की, आम्ही शक्तीप्रदर्शन केलेले नाही, शक्तीप्रदर्शनाची काही गरज नाही शहर परिसरातील शिवसैनिक स्वतःहून आले होते. ही गर्दीच विजयाची खात्री देत आहे. रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष माझ्यावर टीका करत आहेत की मी प्रभारी नगराध्यक्ष असताना काय केले? ते जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा त्यांना सवा वर्षात जे जमले नाही त्या पेक्षा जास्त कामे मी सहा मी करून दाखवले आहे, असा टोला त्यांनी हाणला.

शिवसेनेचा विक्रमी विजय निश्चित- आमदार उदय सामंत
शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत होणाऱ्या मतदानाच्या 70 टक्के मतदान शिवसेनेला होईल.त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार प्रदीप साळवी मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास आमदार सामंत यांनी व्यक्त केला.ते पुढे म्हणाले की, प्रभारी नगराध्यक्षपदाच्या कालावधीत प्रदीप साळवी यांनी चांगले धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. 63 कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेचे काम त्यांना युद्धपातळीवर राबवले आहे. त्याचबरोबर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम त्यांनी वेगाने हाती घेतले आहे. जिल्हा नियोजन मधून नगरपरिषदेला मिळालेल्या निधीतून विकासकामे त्यांनी केली आहेत त्यामुळे शिवसेनेचा विजय होणार हे निश्चित आहे. मी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यांच्याशी नगरपरिषदेच्या निवडणुकीविषयी बोललो. रत्नागिरी शहर सुंदर बनविण्यासाठी निधी देण्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी हे मुंबईत जाहीर केले. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या