मनसुख हिरेन हत्याकांडाचा प्रदीप शर्मा मुख्य सूत्रधार, एनआयएचा उच्च न्यायालयात दावा

चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यानेच कट रचून अत्यंत थंड डोक्याने ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन याची हत्या घडवून आणली. हिरेनची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी सचिन वाझेकडून 45 लाख रुपये घेतल्याचा दावा एनआयएने उच्च न्यायालयात आज दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला.

अँटिलिया या इमारतीबाहेर 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटके ठेवलेली गाडी सापडली होती. ती ठाण्याचा व्यापारी मनसुख हिरेन याची असल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलीस हिरेन याचा तपास करत असताना त्याचा मृतदेह ठाणे येथील खाडीत सापडला होता. शवविच्छेदन अहवालात त्याची हत्या झाल्याचे उघड झाले होते. या हत्येसंबंधी आज एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत हिरेन हत्या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. अँटिलिया स्फोटके प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि जी. ए. सानप यांच्यासमोर आज झाली. दरम्यान, या प्रकरणावरील पुढील सुनावणी 17 जुलैला होणार आहे.