दोन नगरसेवकांच्या चौकशीसाठी प्रदीप शर्मा यांची ठाणे महापालिकेत ‘एण्ट्री’

सामना ऑनलाईन,ठाणे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्या मुसक्या आवळल्यानंतर चकमकफेम पोलीस अधिकारी आणि ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी आज थेट महापालिकेत एण्ट्री केली. इक्बाल कासकरच्या खंडणी टोळीत दोन नगरसेवक असल्याचा गौप्यस्फोट पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या नगरसेवकांची चौकशी करण्याकरिता शर्मा यांनी पालिकेत येऊन आयुक्त जयस्वाल यांची भेट घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.

चकमकफेम प्रदीप शर्मा यांची नेमणूक ठाणे पोलीस आयुक्तालयात काही दिवसांपूर्वी झाली. शर्मा यांनी आपला पहिलाच इंगा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला दाखवला आणि मंगळवारी रात्री त्याच्या मुसक्या आवळल्या. ही घटना वाऱयासारखी पसरताच राष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली. इक्बालच्या अटकेची बोहनी केल्यानंतर प्रदीप शर्मा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.

इक्बालच्या खंडणी टोळीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची नावे त्यात घेण्यात येत असून आज ठाणे महापालिकेची महासभा असतानाही प्रदीप शर्मा हे पालिकेत दुपारी आले. शर्मा यांनी थेट आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या केबीनमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र बंद दरवाजाआड दोघांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.

कासकरच्या खंडणीचे आणखी एक प्रकरण उघड

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याने एका ज्वेलर्सकडून खंडणीच्या रूपात सुमारे १५ लाख रुपयांचे दागिने उकळल्याचे उघड झाले असून याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मी सहजच आलो..

आज मी सहजच पालिकेत आलो, असे सांगतानाच कासकर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

माझे बीपी वाढले, मला आठवत नाही..

चौकशीदरम्यान इक्बाल कासकर याने माझे ब्लडप्रेशर वाढले आहे. मला ब्लडप्रेशरच्या गोळ्या द्या.. असे सांगितले. बीपी वाढल्यामुळे मला काहीच आठवत नाही, अशी बतावणीही त्याने केल्याचे सूत्रांनी सांगितले.

इक्बाल कासकरच्या अटकेनंतर त्याचे अंडरवर्ल्ड कनेक्शन, ड्रग्ज कनेक्शन, हवाला व्यवहार याची कसून चौकशी करण्यासाठी दिल्लीहून  इंटिलिजन्स ब्युरोची टीम ठाण्यात दाखल झाली आहे. या अधिकाऱयांनी आज दिवसभर इक्बालची कसून चौकशी केली.