दाऊद टोळीशी असलेल्या संबंधाचा ‘राष्ट्रवादी’ने खुलासा करावा!

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिलेनियर डेव्हलपर कंपनीच्या माध्यमातून इक्बाल मिर्चीशी केलेल्या व्यवहारांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. या आर्थिक व्यवहारांबाबत काँग्रेसच्या नेतृत्वाने खुलासा करावा, अशी मागणी आज भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.

मला दाऊद इब्राहिम टोळीकडून धमकीचा फोन आला – ठाणे महापौर 

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत संबित पात्रा म्हणाले की, गेले दोन दिवस देशभरातील प्रसारमाध्यमांनी याबाबतच्या बातम्या प्रसारीत केल्या आहेत. या बातम्यांकरून असे दिसते की मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील त्यावेळच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्चीशी मालमत्ता खरेदी व्यवहार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाने दाऊद टोळीशी असलेल्या पटेल यांच्या संबंधाबाबत खुलासा करण्याची गरज आहे. पटेल यांच्या या व्यवहाराची माहिती त्यांनी लढवलेल्या निवडणुकीच्या वेळी का लपवली, याचाही खुलासा होणे गरजेचे आहे, असेही पात्रा म्हणाले.

या व्यवहाराची माहिती मनमोहन सिंग सरकारला नव्हती का?
प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांच्यातील व्यवहाराची माहिती त्यावेळच्या मनमोहन सिंग सरकारला नव्हती का असा प्रश्न करून पात्रा म्हणाले की, आंतरराष्ट्रीत गुन्हेगारी टोळीशी संबंध असलेल्या व्यक्तीबरोबर केंद्रीय मंत्र्याने आर्थिक व्यवहार करणे म्हणजे देशाच्या सुरक्षेशी तडजोड करण्यासारखेच आहे. या व्यवहाराची माहिती त्यावेळच्या तपास यंत्रणांना नक्कीच असेल. असे असताना ही माहिती जाहीर होऊ न देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी दबाव आणला होता का हेही स्पष्ट होणे आवश्यक आहे. ज्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचे दाऊद टोळीतील गुन्हेगारांशी आर्थिक संबंध आहेत अशा पक्षाशी असलेली आघाडी काँग्रेस चालू ठेवणार का, याचा खुलासा सोनिया गांधी यांनी करावा अशी मागणी त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या