कार्लसनला हरवले म्हणजे मी असामान्य खेळाडू ठरत नाही! यशानंतरही 16 वर्षीय प्रज्ञानंदचे पाय जमिनीवरच

एअर थिंग्स मास्टर या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता आणि जागतिक नंबर वन मॅग्नस कार्लसनला मी पराभूत केले याचा आनंद आहेच. पण या विजयामुळे मी कुणी असामान्य बुद्धिबळपटू आहे असे मला कधीच वाटणार नाही, असे स्तुत्य उद्गार काढत हिंदुस्थानच्या या छोटय़ा वीराने मोठय़ा यशानंतरही आपले पाय जमिनीवरच असल्याचे स्पष्ट केले आहे.

16 वर्षीय प्रज्ञानंदने 39 चालींत 31 वर्षीय जगज्जेता कार्लसनला पराभूत करीत जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे. प्रज्ञानंदने याआधी अंडर-8 आणि अंडर -18 गटात बुद्धिबळाचे विश्वविजेतेपद पटकावण्याचा भीमपराक्रम केला आहे. कार्लसनला पराभूत करण्याचा पराक्रम याआधी माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि ग्रॅण्डमास्टर पी. हरिकृष्णा हे दोघे हिंदुस्थानीच करू शकले आहेत. आता त्यांच्या पंक्तीत छोटा प्रज्ञानंद जाऊन बसला आहे. कार्लसनला पराभूत करणाऱया प्रज्ञानंदने अंडर-8 गटाचे जगज्जेतेपद पटकावले तेव्हाच त्याच्याकडे जगाचे लक्ष लागले होते. त्यानंतर पाच वर्षांनी त्याने ‘ग्रॅण्डमास्टर’ किताब पटकावण्याचा भीमपराक्रम केला.

प्रज्ञानंद खरेच जिनियस – आनंद

प्रज्ञानंद म्हणजे प्रग्गू खरेच जिनियस खेळाडू आहे. त्याच्यात बुद्धिमत्ता आणि जिद्द ठासून भरलेली आहे. एवढय़ा कमी वयात जगज्जेत्याला पराभूत करणे ही काही सामान्य कामगिरी नाहीय. आताच्या एअर थिंग्स मास्टर ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेतही सुरुवातीला प्रग्गूला फारसे यश मिळाले नव्हते, पण असीम जिद्दीने त्याने स्वतःचा खेळ उंचावत इतिहास घडवला आहे. माझ्या शुभेच्छा नेहमीच त्याच्यामागे असतील, अशी प्रतिक्रिया हिंदुस्थानचा माजी जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने व्यक्त केली आहे.