नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्या!

560

परतीच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी यासाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा, अशी विनंती प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्ष आमदारांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली.

महाराष्ट्रातील शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे. त्यामध्ये शिवसेनेची भूमिका महत्त्वाची व शेतकऱ्यांना दिलासा देणारी असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी आमदार मंजुळा गावीत, आमदार राजकुमार पटेल हेदेखील उपस्थित होते.

राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱयांना सरसकट 20 ते 25 हजार रुपये हेक्टरी मदत सरकारने जाहीर करावी. डोक्यावर असणारे कर्ज आणि त्यातच हाताशी आलेल पीक वाया गेल्याने आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्जमुक्तीचा विषय तातडीने सोडवून शेतकऱयांना दिलासा देण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. ओला दुष्काळ आणि कर्जमुक्तीबाबतच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे येणाऱ्या काळात शेतकऱयांचा निश्चितच फायदा होईल, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या