ऊस वाहतूकदारांच्या फसवणुकीच्या दखल घ्या, अन्यथा आंदोलन करू; प्रहार संघटनेचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर

नगर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांच्या कोट्यावधी रुपयाच्या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासन व पोलीस खाते दखल घ्यायला तयार नाही. संबंधितांवर गुन्हे दाखल करून घेत नाही. याची दखल घेतलेली नाही तर आठ दिवसांमध्ये संबंधित कार्यालयावर आंदोलन केले जाईल, असा इशारा सत्ताधारी पक्षाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी दिला.

पोटे म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये 50 ते 60 ऊस वाहतूकदारांची फसवणूक झाली आहे. त्याची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. कारखानदार ऊस वाहतूकदारांची करार करतात, त्यानंतर ऊस वाहतूकदार संबंधित मुकादमांची करार करून टोळ्या आणतो व त्यांचे पेमेंट करतो. मात्र, अनेक ठिकाणी या टोळी धारकांनी फसवल्याचे निदर्शनास आले आहे. दुसरीकडे कारखानदार ही ऊस वाहतूकदारांना जबाबदार ठरवून त्यांच्या वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई करत घरादारावर बँकेचा बोजा चढवत आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी आम्ही सहकार खात्याकडे या संदर्भात आवाज उठवला. मात्र कुणीही लक्ष दिले नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला. नगरमध्ये आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. आम्हाला योग्य पद्धतीने न्याय मिळाला नाही तर आम्हाला संबंधित प्रशासनाच्या कार्यालयासमोर आंदोलन केल्याशिवाय पर्याय उडणार नाही, असे सांगत या सर्व बाबींचा सखोल तपास होणे गरजेचे आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.