जिद्द…

आजच्या तरुणांना कॉलेजमध्ये हुंदडण्याशिवाय काही काम नसतं. अभ्यास तर ते मुळीच करत नाहीत अशी ओरड असलेल्या पालकांसाठी लालबागमधील प्राजक्ता हेमंत देसाई हिचं उदाहरण नक्कीच डोळ्यात अंजन घालणारं ठरू शकेल. कारण प्राजक्ताने जिद्दीने आपलं महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण करून ठरवल्याप्रमाणे सैन्यदलात स्थान मिळवलं. आज ती हिंदुस्थान एव्हिएशनच्या युनिटमध्ये मेजर या पदावर कार्यरत आहे.

प्राजक्ता लहानपणापासूनच जिद्दीची… जे ठरवेल ते करून दाखवेल… शाळेत ती महत्त्वाकांक्षी होतीच. तिने तेव्हाच ठरवलं होतं देशासाठी आपण काहीतरी करून दाखवायचं… सैन्यदलाची तिला तेव्हापासूनच आवड होती. म्हणूनच तर शालेय शिक्षण पूर्ण होताच तिने रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला तोच एनसीसीमध्ये जाण्याच्या इराद्याने… रुईयामध्ये बारावी ते पंधरावी या चार वर्षांत एनसीसीच्या माध्यमातून तिने फ्लाईंगचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या मेहनत आणि जिद्दीचा उपयोग तिला येथेही झाला. याच बळावर त्या परीक्षेत प्राजक्ता हिने चांगले प्रावीण्य मिळवलं. त्यात ती अख्ख्या हिंदुस्थानातून चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. एका मराठमोळ्या मुलीने देशभरातून फ्लाइंगसारख्या किचकट विषयात चौथा क्रमांक पटकावणे ही साधी गोष्ट नक्कीच नव्हती.

प्राजक्ताच्या या अतुलनीय पराक्रमामुळे रुईया महाविद्यालयानेही ‘रायझिंग स्टार’ म्हणून सन्मानित केलं आहे. एवढे यश संपादन करूनही प्राजक्ता अजूनही जमिनीवर आहे. आपल्या यशाचं श्रेय ती आपले आईवडील आणि पती मेजर सिद्धेश रावराणे यांना देते. आपल्या वाटचालीत या सर्वांचा फार मोठा आणि बहुमोलाचा वाटा असल्याचं ती आवर्जून सांगते. सध्या ती पठाणकोट येथे सैन्यदलात कार्यरत आहे. तिच्या भावी वाटचालीस आपण सर्वसामान्य माणसं तर केवळ शुभेच्छाच देऊ शकतो.