Lok sabha election result 2024 : प्रकाश आंबेडकर यांनी पराभव केला मान्य; म्हणाले…

लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर असून महायुतीला मोठा झटका बसला आहे. तसेच स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचाही सुपडा साफ झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे खातेही उघडलेले नाही. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर यांचाही अकोला मतदारसंघात पराभव झाला आहे. हा पराभव प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत अकोला आणि महाराष्ट्रातील पराभव मान्य केला आहे. “लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला आणि उर्वरित महाराष्ट्रातील जनादेश नम्रपणे स्वीकारतो. वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे आणि पक्षाप्रति समप्रित होत काम केल्याबद्दल त्यांचे आभार. तसेच नवनिर्वाचित खासदारांचेही आभार, ज्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा पराभव केला. पक्ष जिंकला नाही म्हणून मी निराश आहे, परंतु आशा सोडलेली नाही. मी आणि सहकारी आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मपरिक्षण, विश्लेषण करू आणि आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू”, असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले.