धार्मिक स्थळांचा पैसा ताब्यात घ्या, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

2959

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे कोरोना संकट काळात धार्मिक स्थळांचा सर्व पैसा ताब्यात घेऊन तो गोरगरिबांसाठी वापरावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. देशातील धार्मिक स्थळे ही सरकारची मालमत्ता आहे. सरकारने हिंमत दाखवावी आणि त्यांच्याकडे असणारा पैसा ताब्यात घेऊन तो गरीब माणसांच्या उपजीविकेसाठी खर्च करावा, लोकहितार्थ त्याचा वापर करावा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मोदींवर गुन्हा दाखल करा
जगात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जानेवारीपासूनच लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. मात्र हिंदुस्थानात हे करायला मार्चचा तिसरा आठवडा उजाडला. परदेशातून येणाऱ्या लोकांची योग्य तपासणी करून त्यांना 14 दिवस क्वारंटाईन केले असते तर आपल्या देशात कोरोना पसरला नसता. त्यामुळे कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांनी मोदींविरोधात 302 चा गुन्हा दाखल करावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

केंद्र सरकारचे पॅकेज खोटे आणि फसवे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने जाहीर केलेले पॅकेज खोटे आणि फसवे आहे. यापुढे संकटावर संकट येणार असून त्याचबरोबर श्रीमंतांची श्रीमंती वाढणार आहे, तर गरिबाला अजून गरीब कसे करता येईल याची कोरोना संकटकाळात काळजी घेण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या