एमआयएमशी यापुढे आघाडी करणार नाही, प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली भूमिका

वंचित बहुजन आघाडी आणि ओवेसी बंधूंचा एमआयएम या पक्षाने महाराष्ट्रात आघाडी केली होती. या आघाडीचा फायदा एमआयएमला झाला होता आणि महाराष्ट्रातून इम्तियाज जलील यांच्या रुपाने खासदार मिळाला होता. या एमआयएमशी वंचित बहुजन आघाडी यापुढे युती करणार नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे नेमके काय बिनसले याचा उलगडा झाला. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की एमआयएमने अवाजवी मागणी करायला सुरुवात केली होती, ज्यामुळे यापुढे त्यांच्याशी युती न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, त्यांचा एक खासदार आल्यानंतर वाटाघाटीमध्ये त्यांनी व्यवस्थित बोलणं गरजेचं होतं. त्यांचा आग्रह असा होता की, आम्ही 100 जागांच्या खाली जाणार नाही. आम्ही त्यांना म्हणत होतं की 100 जागा घेणं हे राजकीयदृष्ट्या चूक आहे. त्यामुळे सारासार विचार करा आपण एकत्र बसून विचार करू. 35-50 जागांच्या दरम्यान आपण जागा काढू शकतो, त्यावर नाही. सभेला कितीही गर्दी झाली तरी लढण्यासाठी जी यंत्रणा लागते ती आपल्याकडे नाही. ज्या जागा जिंकू शकतो त्याही सांगतो, त्याचे वाटप आपण करू आणि उरलेल्या वाटेल तेवढे लढू. समजवून सांगतिलं तरी त्यांचा अट्टहास आम्हाला पूर्ण करणं कठीण होतं म्हणून वेगळं जाण्याशिवाय मार्ग नव्हता.