`आठवणीतले अत्रे’चे ऑनलाइन प्रकाशन

251

प्रल्हाद केशव अर्थात आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त 13 ऑगस्ट रोजी दरवर्षी मुंबईत मोठा सोहळा होत असतो. यंदा कोरोना संकटामुळे हा सोहळा होणार नाही. परंतु त्याऐवजी ‘आठवणीतील अत्रे’ हा त्यांच्यावरील विविध मान्यवरांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन ऑनलाईन होणार असल्याचे प्रकाशक नरेन परचुरे यांनी म्हटले आहे.

‘आठवणीतील अत्रे’ हा जवळपास 300 पानांचा ग्रंथ परचुरे प्रकाशनने 1996 साली प्रकाशित केला होता. अनेक मान्यवरांनी लिहिलेले लेख त्यांच्याच शब्दात एक अक्षरही न बदलता त्यात होते. त्याच ग्रंथाची छोटी आवृत्ती म्हणून हे 60 पानांचे पुस्तक तयार करण्यात आले असून त्याचे संपादन राजेंद्र पै यांनी केले आहे. या पुस्तकात ना.सी.फडके, वि.स.खांडेकर, वि.वा.शिरवाडकर, पु.ल.देशपांडे, ग.दी.माडगुळकर, प्रबोधनकार ठाकरे, बाबूराव पेंढारकर, वसंत बापट, अनंत काणेकर, लता मंगेशकर, जयवंत दळवी, द.मा.मिरासदार, शांता शेळके, माधव वझे, ग.पां.परचुरे, मीना देशपांडे व शिरीष पै या मान्यवर लेखकांचे लेख आहेत. त्यांनी अत्रेंबद्दलच्या आठवणी यात लिहिल्या आहेत. माधुरी देव, माधव शिरवळकर, दिलीप धोपेश्वरकर, गोपाळ देऊस्कर, मेहेर चिनॉय आदींचे या गं्रथनिर्मितीला सहाय्य लाभले आहे.

आचार्य अत्रे यांना अभिवादन

‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी गर्जना करून संयुक्त महाराष्ट्रासाठी जनआंदोलन उभारण्यात अग्रणी असलेले पत्रकार, लेखक, वक्ते आचार्य ऊर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांची 122वी जयंती गुरुवारी साजरी करण्यात आली. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी नाका चौकातील आचार्य अत्रे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वरळी नाका चौकात झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक अरविंद भोसले, आचार्य अत्रे स्मारक समितीच्या अध्यक्षा आरती सदावर्ते, आचार्य अत्रे यांचे नातू विक्रमादित्य पै, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, दीपक देवगुंडे, शिवानी जोशी, प्रसाद रावकर तसेच समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी 2020चा काकासाहेब पुरंदरे पुरस्कार महेश म्हात्रे यांना जाहीर करण्यात आला. 15 सप्टेंबर 2020 रोजी आयोजित कार्यक्रमात महापौरांच्या हस्ते हा पुरस्कार म्हात्रे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या