पोलीस फिट रहावेत यासाठी मराठी तरूणाची धडपड, स्वखर्चातून राबवलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

1207

जगभरात कोरोना थैमान घालत असताना देशभरात त्याचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला. या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच या काळात डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी रुग्णसेवेचे कर्तव्य बजावत होते. तर जनतेत कोरोनाचे संक्रमण पसरू नये यासाठी पोलीस अहोरात्र तैनात होते. ठिकठिकाणी नाकाबंदी करून विनाकारण बाहेर पडण्याऱ्यांना रोखणे आणि कायदा- सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ते पार पाडत होते. हे पोलीस मोठा धोका पत्करून जनतेसाठी कर्तव्य बजावत होते. या पोलीसांमध्ये प्रभादेवीतील प्रसाद सावंत या तरुणाला जनतेच्या रक्षणासाठी रसत्यावर उभ्या असलेल्या वर्दीतील पांडुरंगाचे दर्शन झाले. आपल्यासाठी धोका पत्करून रस्त्यावर कर्तव्य बाजवणाऱ्या पोलीसांसाठी काहीतरी करण्याचे प्रसादने ठरवले आणि या पोलिसांना आरोग्यदायी हळददूध देण्याचा उपक्रम त्याने सुरू केला. स्वखर्चाने राबवलेल्या या उपक्रमात कुटुंबियांनी त्याची मदत केली.

लॉकडाऊन लागू झाल्यापासून झाल्यापासून नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या पोलिसांना मदत करण्याचे प्रसादच्या मनात होते. या काळात सर्व सेवा बंद असल्याने पोलिसांना कर्तव्यावर असताना खाण्यापिण्यासाठी काहीही मिळत नसेल, हे प्रसादच्या लक्षात आले आणि या पोलिसांना दररोज संध्याकाळी हळददूध देण्याचा उपक्रम त्याने सुरू केला. 3 एप्रिलपासून प्रसादने या उपक्रमाला सुरुवात केली तर 30 मेपर्यंत दोन महिने हा उपक्रम अखंडजपणे राबवला. दररोज 100 ते 120 पोलिसांना तो हळददूध देत होता. माहिम ते लालबाग परिसरातील 7-8 ठिकाणी नाकाबंदीवर तैनात असलेल्या पोलिसांना तो हे आरोग्यदायी हळददूध देण्यासाठी दररोज बाईकवरून तो 15 किमीचा प्रवास करत होता.

या कामात त्याला कुटुंबियांनी मदत केली. दररोज 10 लिटर दूध तो आणायचा. त्याची आई हळददूध बनवायची आणि वाटपात त्याची बहीण त्याची मदत करत होती. हा उपक्रम तो स्वखर्चाने करत होता. त्यानंतर मित्रपरिवावर आणि परिसरातील नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनाही प्रसादच्या कामात हातभार लावला. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी मोठा धोका पत्करून जनतेचे रक्षण केले. त्यासाठी प्रसादने पोलिसांना सन्मानपत्र दिले. त्यावर वर्दीतील पांडुरंग असा उल्लेख आहे. सुमारे 180 पोलिसांना त्याने हे सन्मानपत्र दिले. आपल्याला रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांमध्ये वर्दीतील पांडुरंग दिसला आणि आपण आपल्यापरीने त्याच्यासाठी काहीतरी केले, याचे समाधान आहे, असे प्रसादने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या