विद्याभाऊ सदावर्ते

<<प्रशांत गौतम>>

ज्येष्ठ पत्रकार विद्याभाऊ सदावर्ते यांच्या निधनाने साडेपाच दशकांपासून सुरू असलेला पत्रकारितेतील प्रवास संपला आहे. संभाजीनगर शहरातील पत्रकारिता पहिल्या पिढीत दै. ‘मराठवाड्या’चे अनंत भालेराव,
दै. ‘लोकविजय’चे पांडुरंग रांजनीकर, आबा मुळे, ‘लोकसत्ता’ व ‘लोकनेता’चे पांडुरंग गणोरकर यांनी वैशिष्टयपूर्ण लेखणीने पत्रकारिता गाजवली. दुसऱ्या पिढीत विद्याधर सदावर्ते, गोपाळ साक्रीकर, गंगाधर पटणे, सुखराम हिवराळे, लक्ष्मण देशपांडे, सुदाम मगर, बा.न. मग्गीरवार, शांताराम जोशी, विठ्ठल विभुते, महादेव कुलकर्णी, मनोहर कुलकर्णी आणि सुधाकर कुलकर्णी या दुसऱ्या पिढीतील पत्रकारांनी पत्रकारितेचे नवे आयाम जोपासले.  प्रत्येकाची राजकीय विचारसरणी, दैनिकांचे व्यासपीठ वेगळे असले तरी परस्परांतील मैत्रीभाव नक्कीच वाखाणण्याजोगा होता. विद्यार्थीदशेपासूनच विद्याभाऊंना पत्रकारितेची आवड निर्माण झाली. स्थानिक व जागतिक राजकारणाचाही भाऊंचा अभ्यास होता. मराठी, इंग्रजी, उर्दू भाषेवर चांगले प्रभुत्व असल्याने त्याचा त्यांना पत्रकारितेसाठी नक्कीच चांगला उपयोग झाला. गोष्टीवेल्हाळ स्वभाव असल्याने त्यांनी माणसं जोडण्याचे काम केले. इतकेच नाही तर दुसऱ्यांमधील गुण अचूकपणे हेरण्याची व त्यांना लिहिते करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. राजकीय क्षेत्रातील विषयांच्या संदर्भात ते समोरच्या व्यक्तीकडून ऐकून घेत, पण आपला मुद्दाही सोडत नसत. भाऊंच्या गप्पीष्ट स्वभावाचे प्रतिबिंबही त्यांच्या पत्रकारितेमध्ये उमटले. स्तंभलेखनातील बाबुराव नावाचे पात्र त्यांनी भलतेच खुमासदार पद्धतीने रंगवले. साहित्य, कला, लेखन, समाजकारण, राजकारण या विषयाची त्यांना उत्तम जाण होती. ऐतिहासिक संभाजीनगर शहराची त्यांना इत्थंभूत माहिती होती. म्हणूनच त्यांना शहर पत्रकारितेचा चालता-बोलता इतिहास आहे, असे समजले होते. ‘अजिंठा’, ‘गावकरी’, ‘लोकमत’, ‘तरुण भारत’, ‘सांजवार्ता’ आदी विविध दैनिकांतून त्यांनी काम केले व खुमासदारपणे स्तंभलेखनही केले. अजिंठा दैनिकात काम करत असताना त्यांच्या पत्रकारितेसाठी तत्कालीन कार्यकारी संपादक त्र्यंबक कृष्णा तरटे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. दैनिकामध्ये स्वतः विविध पदांवर काम करत असताना त्यांनी नव्या पिढीतील पत्रकारांना संपादनाचे मार्गदर्शनाचे उत्तम धडे दिले. विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात जे काही शिकायला मिळत नसे ते भाऊंसारख्या जुन्या काळातील पत्रकाराकडून हमखास मिळत असे. वृत्तपत्रात काम करत असताना पुरवणी अथवा दैनिकाची उत्तम सजावट करणे, पत्रकार आणि लेखकाकडून नवनव्या विषयांवर लिहून घेणे, त्याचे संपादन करणे. लेखक, पत्रकार काही चुकला असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करणे ही तर भाऊंची हातोटी होती. नवा पत्रकार अष्टपैलू, व्यासंगी, अभ्यासू असला पाहिजे, यादृष्टीने त्यांचे होणारे मार्गदर्शन भावी पत्रकारांसाठी उपयुक्त ठरणारे होते. एखाद्या बातमीचे शीर्षक कसे द्यावे, कोणती बातमी कोणत्या जागी घ्यावी, याविषयी त्यांचे तरुण पत्रकारांना अचूक मार्गदर्शन असायचे. भ्रष्टाचाराची बातमी आली की, ‘कोई नही देखता डरो मत इससे, भर अब्दुल्ला गुड थैली मे’ असे शीर्षक त्यांनाच सुचत असे, बातमीचे वृत्तमूल्य आणि मांडणी कौशल्य यात ते निष्णात होते.

मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपला मित्रपरिवार निर्माण केला. राजकीय क्षेत्राशीही त्यांना वावडे नव्हते. एखाद्या राजकीय नेत्याची रंगलेली सभा असो की, भाषणबाजी असो, त्याचे इरसाल वर्णन करावे ते भाऊंनीच. त्याचेच पडसाद त्यांच्या वैविध्यपूर्ण लिखाणातून उमटत असे. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला होता. पत्रकारितेत दिलेल्या योगदानाबद्दल अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचा दुधगावकर पुरस्कार तसेच दर्पण आणि विश्वसंवाद संस्थेच्या नारद पुरस्कारानेही विद्याभाऊ सन्मानित झाले होते. राज्य शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार व २०१५ साली पत्रकार अरविंद वैद्य स्मृती पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. भाऊंच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रातील चालता-बोलता इतिहास लुप्त झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या