न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण दोषी, 20ऑगस्टला शिक्षेवर युक्तिवाद होणार

691
prashant-bhushan

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांना शिक्षा काय द्यायची याबाबतचा निर्णय 20 ऑगस्टला घेतला जाणार आहे. न्यायव्यवस्थेचा अपमान करणारी 2 ट्विट केल्याचा भूषण यांच्यावर आरोप होता. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत याचिका दाखल केली होती. न्यायमुर्ती अरूण मिश्रा, न्यायमुर्ती बी.आर.गवई आणि न्यायमुर्ती कृष्णमुरारी यांच्या खंडपीठाने भूषण यांना दोषी ठरविले आहे.

न्यायालयाने या प्रकरणाचा अंतिम निर्णय 5 ऑगस्टला राखून ठेवला होता, जो आज सुनावण्यात आला. प्रशांत भूषण यांनी ट्विटबाबत त्यांची भूमिका मांडताना म्हटले होते की त्यांनी ही ट्विट न्यायमुर्तींच्या वैयक्तिक पातळीवरील वागणुकीबद्दल केली होती. त्यांच्या ट्विटमुळे न्यायालयीन प्रशासनामध्ये कोणतीही बाधा निर्माण झाली नव्हती.

न्यायालयाने प्रशांत भूषण यांना या प्रकरणी 22 जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. हे प्रकरण न्यायालयासमोर उभे राहिले तेव्हा भूषण यांची बाजू दुष्यंत दवे यांनी मांडली होती. त्यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद सादर करताना म्हटले की भूषण यांनी न्यायशास्त्राच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे. किमान 50 मोठ्या प्रकरणातील निर्णयांचे श्रेय त्यांच्याकडे जाते, ज्यामध्ये टूजी स्पेक्ट्रम, कोळसा खाण वाटप घोटाळा यासारख्या प्रकरणांचाही समावेश आहे. त्यांच्या कार्याबद्दल तुम्हीही त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला असता. दवे यांनी जबलपूर इथल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या प्रकरणाचा हवाला देत म्हटले की न्यायाधीशांविरोधात सहन न केल्या जाऊ शकणाऱ्या टीकेबाबतही त्यांच्याविरोधात अवमानाची कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र न्यायालयाला हे युक्तिवाद फार पटले नव्हते. त्यांनी म्हटले की भूषण यांची ट्विट ही सामान्य लोकांच्या नजरेतून पाहिल्यास सरन्यायाधीशांच्या शुचितेवर आणि अधिकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत ते अयोग्य असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलंय.

आपली प्रतिक्रिया द्या