प्रा. डॉ. प्रभाकर मांडे

<<प्रशांत गौतम>>

लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. प्रभाकर मांडे यांची पहिल्या अखिल भारतीय लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. लोकशाहीर पठ्ठे बापुराव यांच्या शतकोत्तर महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. खरे तर आजपर्यंत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांचे लोकसाहित्य क्षेत्रातील भरीव योगदान लक्षात घेऊन हा सर्वोच्च सन्मान डॉ. मांडे यांना मिळायला हवा होता, पण तसे आजपर्यंत होऊ शकले नाही म्हणून त्यांचे लेखन, संपादन आणि संशोधन क्षेत्रातील अद्वितीय कार्य यांचे महत्त्व कमी होत नाही. डॉ. मांडे यांनी लोकसाहित्याच्या संवर्धन नि संगोपनासाठी आजपर्यंत भरीव योगदान दिले. संशोधन प्रकल्प कार्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्रवास झाला.

अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी यातून झालेले संशोधन आणि संशोधनातून आलेले लेखन, ग्रंथसंपदा आजही या क्षेत्रात अभ्यास करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. आजच्या काळात मौखिक वाङ्मय परंपरेचे महत्त्व अनेकांना माहीत नाही. अशा परिस्थितीमध्ये डॉ. मांडे सरांचे सततचे अभ्यासपूर्ण लेखन नव्या पिढीसाठी नक्कीच मार्गदर्शन करणारे आहे.

मराठवाडय़ातील कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी, पंडित दामोदर रचित महानुभावीय पद्मपुराण (संपादन), चतुरदास विरचित एकादश स्कंध भाषाटीका (हिंदी संपादन), मायबोलीचे व्याकरण व लेखन (संयुक्त संपादन), लोकसाहित्याचे अंतःप्रवाह लोकसाहित्याचे स्वरूप, दलित साहित्याचे निराळेपण, गावगडय़ाबाहेर, सांकेतिक आणि गुप्त भाषा ः परंपरा आणि स्वरूप, लोकरंगकला आणि नागर रंगभूमी (संपादन) लोकरंगभूमी : परंपरा स्वरूप आणि भवितव्य, मांग आणि त्यांचे मागते, लोकमानस रंग आणि ढंग, भारतीय आदिवासी : विकासाच्या समस्या, लोकसंस्कृतीचे मूलतत्त्व, बुडलेले गाव लोकपरंपरेतील स्त्र्ााr प्रतिमा Aspects of Folk-Culture या सारखी साहित्य संपदा डॉ. मांडे सरांच्या नावावर जमा आहे. मांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत १२ विद्यार्थी पीएच.डी. व तेवढेच एम.फील झाले. विद्यार्थ्यांच्या संशोधन कामात मार्गदर्शन असो की लेखन संशोधन असो. जात पंचायतीचा अभ्यास असो की प्रवास असो त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे योगदान असतेच. जनसामान्यातही ऋषीतुल्य अशी ओळख लाभलेल्या डॉ. मांडे सरांच्या तीन-तीन ठिकाणी अमृतमहोत्सवी सोहळे चाहत्यांनी साजरे करण्याचे भाग्य लाभले.

लोकसाहित्यातील पारंपरिक श्रमगीते, मौखिक ओवी, ध्वनिगीते, बालगीते आणि बडबडगीते, पारंपरिक दिनक्रम आणि मौखिक परंपरा, विविध गीतांची मौखिक परंपरा, स्त्रीयांची मौखिक खेळ गाणी, स्त्रीयांच्या कथा गीतांची मौखिक परंपरा, कानाबाईच्या गाण्याची मौखिक परंपरा, म्हणी, वाप्रचार, भावनिक कथा संबंध, आरत्या, तडवी, भिल्ल, गिरी वनातील जनजाती, धनगर, मातंग, मंत्रात्मक रचना, चक्रपूजा, लोकसाहित्यातील अशा मौखिक परंपरेचा डॉ. मांडे सरांचा दांडगा अभ्यास आहे.

नित्य नूतन संशोधनातून आलेले त्यांचे संशोधनात्मक लेखन अशा किती तरी भरीव कार्यातून त्यांचे योगदान अधोरेखित होते. पारंपरिक ओव्या, लोकगीतं, लोककथा यांचे आज संवर्धन, संगोपन होण्याची गरज आहे. ग्रामीण भागात हा मौलिक ठेवा जपला जातो. त्याची ओळख शहरी भागातील लोकांमध्येही होण्याची गरज आहे. यासंदर्भात डॉ. मांडे यांना लोकसंस्कृतीविषयी आवड होतीच. लोकसंस्कृतीसारख्या गंभीर विषयाच्या अभ्यासाकडे तसं दुर्लक्ष होत होते. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांनी अभ्यास केला.

१९६० नंतर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात लोकसंस्कृतीचा अभ्यास, या विषयाला संशोधनाला मान्यता मिळाली. विद्यापीठात त्यांनी पीएच.डी.साठी नाव नोंदवले. एक संशोधक विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेले ते महाराष्ट्रातील पहिले होते. कारण आजपर्यंत लोकसाहित्याच्या क्षेत्रात आजपर्यंत कुणी संशोधन केले नव्हते. कुणी पीएच.डी. ही मिळवली नव्हती आणि त्यासाठी एखादा जाणकार मार्गदर्शक मिळणे ही तर अशक्य अशी बाब होती. मात्र प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या सारखा लेखक, अभ्यासक, मार्गदर्शक लाभल्याने डॉ. मांडे यांचा पीएच.डी.चा मार्ग व त्या नंतरचा लेखन, संशोधन कार्याचा प्रवास सुकर होत गेला. अर्थात त्याचा पाया संभाजीनगरातील मिलिंद महाविद्यालयामध्ये म. भि. चिटणीस यांनी घालून दिला. डॉ. मांडे यांच्या लेखन प्रवासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद लाभला. म. भि. चिटणीस आणि प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्यासारखे गुरू लाभले. अलीकडच्या काळात मांडे यांची मौखिक वाङ्मय स्वरूप आणि समीक्षा, लोक संस्कृतीची मूलतत्त्व, जातगावची पंचायत आणि मिथिकाचे भाव विश्व ही चार महत्त्वाची पुस्तके आली. वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांचा लेखन आणि संशोधन कार्यातील उत्साह नव्या पिढीस प्रेरणा देणारा आहे.