केदारनाथ सिंह

179

 <<प्रशांत गौतम>>

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात हिंदी कवी केदारनाथ सिंह यांच्या निधनाने हिंदी साहित्यातील एक तारा निखळला आहे. आपल्या सकस आणि अभिजात साहित्य निर्मितीतून त्यांनी हिंदी साहित्याला वेगळी उंची प्राप्त करून दिली हे त्यांच्याच कवितेतून आपल्या लक्षात येऊ शकते.

मैं जानता हूँ बाहर होना एक ऐसा रास्ता है।        

जो अच्छा होने की ओर खुलता है।

और मैं देख रहा हूँ इस खिडकी के बाहर एक समुचा शहर है।

केदारनाथ सिंह यांची कवितेप्रती असलेली संवेदना किती तरल आहे हे समजते. ७ जुलै १९३४ साली उत्तर प्रदेशातील बलिया जिह्यातील चकिया या गावी जन्मलेल्या केदारनाथांचा साहित्य प्रवास ८३ व्या वर्षी थांबला. बनारस हिंदी विश्व विद्यालयात १९५६ साली पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी १९६४ च्या सुमारास एम.ए. पूर्ण करून पीएच.डी. संपादन केली. बनारस हिंदी विश्व विद्यालयात अध्ययन आणि अध्यापन करतानाच त्यांनी आपली साहित्य निर्मिती ही वैविध्यपूर्ण व बहुआयामी ठेवली. हिंदी विभागाचे प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांना विविध महाविद्यालयांमध्ये सन्माननीय प्राध्यापक म्हणून निमंत्रित केले जात असे. त्या निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी कवितांच्या संदर्भात मार्गदर्शन केले. समकालीन कवींच्या तुलनेतही केदारनाथसिंह यांची कविता वेगळी होती. एवढेच नाही तर त्यांच्या अनेक अभिजात कवितांत ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांच्यातील द्वंद्व फार मनोवेधकपणे मांडण्यात आले आहे. केदारनाथ सिंह यांनी आपली साहित्य निर्मिती प्रामुख्याने कविता, समीक्षा आणि संपादन या प्रकारातून केली आहे. अभी बिल्कुल अभी, जमीन पक रही है, यहा से देखो, वाघ, अकाल में सारस, उत्तर कबीर और अन्य कविताएं, तालस्ताम और सायकल (कवितासंग्रह) कल्पना और छायावाद, आधुनिक कविता और बिबविधान, मेरे समय के शब्द, मेरे साक्षात्कार (समीक्षा संग्रह) तसेच ताना-बाना (आधुनिक भारतीय कविता से एक चयन), समकालीन रुसी कविताऐ, कविता दशक, शब्द, साखी (अनियतकालिक पत्रिका) हे सांगता येईल. केदारनाथांच्या अनेक कवितांमध्ये निसर्ग दिसतो. निसर्गाचे केवळ वर्णन कवितेत नसते, तर विविध प्रतीके आणि प्रतिमांच्या माध्यमातून वाचकांना आपल्या मनातले सांगत असतात. भिकाऱ्याच्या वाडग्यात, वसंत ऋतू स्पर्शातल्या एकटेपणालाच कवचासारखे धारण करणे यासारख्या प्रतिमांचे दर्शन वाचकांना होत असते. निसर्गाचे विलोभनीय रूप दाखवत असताना विविध प्रतीके आणि प्रतिमांच्या माध्यमातून त्यांना वाचकांना काही तरी सांगायचे असते. ते तर सांगतातच पण हे सांगणे वाचकांच्या मनास भिडते आणि त्यांच्या मनात घरही करते. आधी संगितल्याप्रमाणे अनेक कवितांमधून शहरी आणि ग्रामीण भाग यांच्यातील द्वंद्व दिसते. दोन्ही ठिकाणचे जगणे व्यक्त होते. ‘खेडे कालचे आणि शहर आजचे’ असे न म्हणता खेडेसुद्धा आजचेच, तेही ग्रामीण वास्तवाकडे पाहणारे असे ते म्हणत. याचे भान त्यांनी आपल्या साहित्याच्या प्रवासात कायम ठेवले. एकूणच लिखाणात केदारनाथांनी मानवी जीवनाच्या संदर्भात चिंतन मांडले आहे. महाविद्यालयात असल्यापासूनच त्यांच्या काव्यलेखनाची सुरुवातही झालेली होती. त्यातून ते वाचकांपर्यंत पोहचले आणि लयदार गीतांची निर्मिती करून अनेक कानसेनांचे कानही तृप्त केले. काशी विद्यापीठात असतानाच त्यांचा एक कवितासंग्रह कवी अज्ञेय यांना आवडला होता. १९५५ मध्ये ‘अनगत’ ही कविता त्यांच्या काव्यप्रतिभेची साक्ष पटवणारी होती. १९५९ च्या सुमारास ‘सप्तक’ हा कवितासंग्रह कवी अज्ञेय यांनी संपादित केला होता. त्यात केदारनाथांच्या वीस कवितांचा समावेश होता. ही त्यांच्यासाठी खास गौरवाची बाब होती. त्यांच्या साहित्य प्रवासात साहित्य अकादमी, ज्ञानपीठ हे सन्मान वाटय़ाला आले. पण त्याच्या किती तरी आधीच्या काळात अज्ञेय यांच्या कवितासंग्रह संपादनात वीस कवितांचा समावेश होणे, ही बाब पुरस्काराच्या तोडीचीच समजली जात असे. प्रयोगवादी कवी अशी त्यांची ओळख असली तरी त्यांची कविता ही कठोरही नव्हती आणि स्वप्नाळूहीं नव्हती. निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांना बनारसच्या महाविद्यालयात प्राप्त झाला, जो त्यांनी आपल्या विविध आशयपूर्ण कवितांमधून प्रभावीपणे मांडला. केदारनाथ सिंह यांना त्यांच्या साहित्य लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कारासह मैथिलीशरण गुप्त, कुमारन आशान, जीवन भारती, दिनकर साहित्य अकादमी, व्यास पुरस्कार असे महत्त्वाचे पुरस्कार लाभले. दर्जेदार अभिजात साहित्य निर्मितीने केदारनाथ सिंह यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाने हिंदी साहित्याची मोठी हानी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या