धनंजय जोशी

122

<<प्रशांत गौतम>>

नांदेड येथील शास्त्रीय संगीतातील प्रतिभावंत गायक धनंजय जोशी हे एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. आवडीचे आणि करीअर करण्याचे दोन्ही क्षेत्र वेगवेगळे असले तरी जोशी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचे वेगळेपण नेहमीच जपले आहे. शास्त्रीय संगीताच्या मैफली रंगवत असतानाच त्यांनी नाटय़रंग कार्यक्रमाच्या माध्यमातून एक अनोखा प्रयोग केला आहे. आजपर्यंत अनेक ठिकाणी त्यांच्या नाटय़ संगीताच्या मैफलींना उत्तम प्रतिसाद लाभला. नाशिक येथे येत्या २१ एप्रिल रोजी नाटय़रंगची मैफल रंगणार आहे.संगीत नाटय़ परंपरेविषयी, नाटय़ संगीताची आवड रसिक प्रेक्षकांत पुन्हा निर्माण व्हावी, या उद्देशाने गोविंद पुराणिक यांनी नाटय़रंग कार्यक्रमाची संकल्पना मांडली. त्याला गायक संजय जोशी, तालवादक डॉ. जगदीश देशमुख, संगीत शिक्षक डॉ. प्रमोद देशपांडे यांनी निर्मितीचे मूर्त रूप दिले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, रसिकांची भरघोस दाद प्राप्त झाली. त्यामुळे नाटय़रंगचाही लौकिक सर्वदूर पसरू लागला. तसेच पनवेल, नाशिक, नागपूर, पुणे, जबलपूर, उज्जैन येथे ही नाटय़संगीताची मैफल जोरदार झाली. एकूणच संगीत नाटकाच्या बाबतीत ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका
डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया खूप मौलिक आहे आणि नव्या पिढीतील गायकांसाठी ती महत्त्वाची आहे. त्या म्हणतात, ‘ज्यांनी संगीत नाटकात प्रत्यक्ष गायक नटाची भूमिका केलेली आहे, असे गायक नट प्रभावीपणे नाटय़गीतांचे गायन करू शकतात.’ नाटय़रंगची पहिली मैफल फेब्रुवारी २०१७ रोजी स्वरसम्राट (अ.भा. नाटय़ परिषद) आणि संस्कार भारती नांदेड शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. ठरावीक कालावधीत अशा मैफली आयोजित होत असतात. त्यासाठी दोन्ही गायक जोशींना अभिजित अपस्तंभ, संगीता चौधरी, आसावरी देसाई, प्रशांत गाजरे, पं. शिवदास देगलूरकर, नरसिंग देसाई, पंकज शिरभाते यांची साथसंगीत लाभत असते. तर निर्मितीसाहाय्य म्हणून विजय जोशी, गजानन पिंपरखेडे, नाथा चितळे यांचे सहकार्य लाभत असते.

येत्या २१ एप्रिल २०१८ रोजी नाशिक येथे नाटय़रंगची मैफल रंगणार आहे आणि नजीकच्या काळात नागपूर, बेळगाव येथे नाट्यरंग कार्यक्रमासाठी निमंत्रण आहे.

नाट्यरंगाच्या कार्यक्रमातील  मुख्य गायक धनंजय जोशी यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण पं. रमेश कानोले यांच्याकडे घेतले. प्रारंभी पंढरपूर येथे संगीत महाविद्यालयात सेवा दिली. रमेश कानोले यांनी सर्वप्रथम धनंजय जोशी यांना संगीत नाटकात भूमिका करण्याची संधी दिली. त्यावेळी संगीत नाटकातील प्रवेशाची स्पर्धा होती. एका प्रवेशात त्यांनी धैर्यधराची भूमिका केली. त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांमध्ये जयमाला शिलेदार उपस्थित होत्या. प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांनी धनंजय जोशी यांना ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ या नाटकासाठी पाचारण केले. प्रयोगाच्या केवळ तीन दिवस आधी निमंत्रण मिळाले. सलग ४८ तास कसून सराव केला. आणि कसदार अभिनय आणि उत्कृष्ट गायकीने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

भरतनाट्य व ललित कला निधी, मुंबई प्रस्तुत आणि रवींद्र खरे दिग्दर्शित ‘संगीत मृगरंजनी’ या नाटकात धनंजय यांनी बैजूची प्रमुख भूमिका साकारली होती. पंडित सुहास व्यास यांच्या संगीत नियोजनाने प्रयोग अधिकच प्रभावी झाला. रंगलेल्या या प्रयोगासाठी नाटय़, संगीत क्षेत्रातील दिग्गज कलावंत रामदास कामत, पं. अजय पोहनकर, फय्याज, विद्याताई अभिषेकी, पं. शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी रामदास कामत यांनी धनंजयच्या संगीत नाटकातील गायन आणि अभिनय कलेची प्रशंसा केली आणि नांदेडसारख्या ठिकाणी संगीत रंगभूमीची सेवा करीत असल्याबद्दल पाठीवर कौतुकाची थाप मारली. २०११ च्या सुमारास विश्वनाटय़ संमेलन अमेरिकेत न्यू जर्सी येथे झाले होते. मराठवाड्याच्या या गुणी कलावंताने मराठवाडा आणि महाराष्ट्राची माय मराठीच्या गौरव परंपरेची ध्वजपताका सातासमुद्रापार झळकावली. शास्त्र्ााrय संगीत प्रगतीचे शिखर गाठण्याच्या प्रवासात धनंजयला पं. अजय पोहनकर यांच्यासारखे दिग्गज गुरू लाभले. त्याच आशीर्वादाच्या बळावर कार्यक्षेत्राची सुरेल वाटचाल सुरू झाली. ऐन तारुण्यात त्यांच्या वाटय़ाला अनेक मानसन्मान आणि पुरस्कारही आले. संगीत नाटकासाठी ते देत असलेले योगदान निश्चित महत्त्वाचे समजले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या