परिचारकांचे निलंबन रद्द करण्यावरून विधानसभेत गदारोळ

सामना ऑनलाईन, मुंबई

सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचा अपमान करणारे आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाचे आज विधानसभेमध्ये पडसाद उमटले. निलंबन मागे घेणाऱ्यांना शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहामध्ये खडसावत प्रश्न विचारला की हे निलंबन मागे का घेण्यात आलं ? परिचारकांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा आणि त्यांचे निलंबन कायम ठेवावे अशी मागणी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीही केली. या मुद्दावरून विधानसभेत झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.परिचारक यांनी नेमकं काय विधान केलं होतं ते ऐकण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडीओवर क्लिक करा.

विधान परिषदेचे आमदार असलेल्या परिचारकांच्या या विधानामुळे त्यांचे दीड वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते. मात्र वर्षभरातच त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. परिचारक हे भाजपच्या जवळचे असल्याने निलंबन रद्द करण्यात आल्याची कुजबूज आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना याच मुद्यावरून भाष्य केलं होतं. शहीद सैनिकांचा अपमान करणाऱया आमदार प्रशांत परिचारक याच्यासारख्या नालायकाला वाचवण्यापेक्षा जोडय़ाने मारून त्याची गाढवावरून धिंड काढा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर तोफ डागली होती. परिचारक याचे निलंबन मागे घेत असाल तर पंतप्रधान मोदींबद्दल सोशल मीडियावर टीका करणारे नगरचे पोलीस शिपाई रमेश शिंदे यांचेही निलंबन मागे घ्या. पंतप्रधान जर तुम्हाला दैवतासारखे वाटत असतील तर देशाचे सैनिकही आमचे दैवत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले होते. आमदार, खासदारांना जसा हक्कभंग आणण्याचा अधिकार आहे तसा जवानांना का नाही, असा खणखणीत सवालही त्यांनी विचारला होता.