चैतन्यदायी अनुभव

43

नमिता श्रीकांत दामले

चैतन्यरंग हा प्रवीण दवणे यांचा वैचारिक ललित लेखसंग्रह आहे. प्रवीण दवणे यांनी कविता, ललित, वैचारिक, नाटक, एकांकिका, बालवाङ्मय असे विपुल लिखाण आपल्या सिद्धहस्ते केले आहे. त्यांच्या प्रस्तुत लिखाणात अनेक भावबंध व संस्कार यांची सुरेख गुंफण आहे.

प्रवीण दवणे हाडाचे शिक्षक आहेत. त्यांच्यामधली नवीन पिढी घडविण्याची तळमळ, या पिढीकडे आपल्या संस्कारांचा, विचारांचा, रुढी-परंपरांचा वारसा संक्रमित करण्याची कर्तव्य तत्परता या लिखाणातून स्पष्टपणे दिसते. निसर्गाचा आस्वाद घेणे, नवीन ऋतूचा बहर अनुभवणे, छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून आनंद घेणे व उत्साहाच्या कारंज्यामधून चैतन्याची लागण करणे हा लेखनामागचा हेतू आहे.

याची सुरुवात एका समृद्ध, विचारशील सुसंस्कृत, क्षमाशील पिढी घडवण्यातून होतो, तर शेवट एका ममतामयी व आपुलकीने भरलेल्या अगत्यशील घरात होतो. गप्पा, पत्र, पाऊस, तारुण्य, गारवा, राजकुमारी अशा काही मनाचा ताबा घेणाऱया हळव्या कोपऱयांमध्ये रूजू मनाने लेखक डोकावतो व स्वतःचे अंतरंग व्यक्त करताना वाचकांच्या अंतरंगाचा ठाव घेतो. भातुकली-गाभुळलेल्या चिंचा या लेखांमधून बालपण खुणावते, साद घालते.

लेखकाच्या लहानपणीचा गणेशोत्सव आणि आजचे त्याचे स्वरूप, वहीच्या जीर्ण पानांमधून डोकावणाऱया आपले गाव नशामुक्त करणाऱया माई, या भिंती कोण पुसणार असा खडा सवाल, दुष्काळ या सर्व लेखांचे विषय सामाजिक असून लेखकांने आपल्या लालित्यपूर्ण शैलीत ते मांडले आहेत. ‘सुंदर असतं ते स्वातंत्र्य’मध्ये चाकोरीबद्ध नोकरीच्या बंधनात अडकलेल्या मध्यमवर्गीय सामाजिक मानसिकतेबद्दल भाष्य केले आहे. समजुतींच्या भिंती, घर, वात्सल्याचे बंध यातून लेखक कौटुंबिक भावबंध व हळवे भावविश्व यात रमतो. भटकंती, प्रवास, प्रवासात भेटणारी माणसे वाचण्याची सवय, निसर्गाची विविध रूपे या विषयांवर लिहिताना लेखकाच्या प्रतीक्षेला विशेष बहर येतो.

झुरणारी पत्रं, आठवणींचे अल्बम यामधून पत्रांमध्ये आणि फोटोंमध्ये लेखक रमतो. आजच्या पिढीला ती मजा अनुभवताच येणार नाही. कारण फोटोही डिजिटल आणि पत्रेही डिजिटल नाशीवंत. पुनः पुन्हा आनंद घेण्याची आठवणींमध्ये रमण्याची, रेंगाळण्याची आता शक्यता नाही. अशा सगळय़ा हळव्या गोष्टींमध्ये रमण्यासाठी, डोळे उघडे ठेवून जगण्यासाठी, ताजेतवाने होण्यासाठी चैतन्यरंगाचा अनुभव नक्की घ्यावा.

चैतन्यरंग

लेखक..प्रवीण दवणे

प्रकाशक..नवचैतन्य प्रकाशन, मुंबई-९२

पृष्ठ..१५२, मूल्य..१६५ रु.

 

आपली प्रतिक्रिया द्या