नागपूर महापलिकेत भ्रष्टाचार, डॉक्टर दांपत्याने जमवली अडीच कोटींची ‘माया’!

1135
प्रातिनिधिक फोटो

नागपूर महानगर पालिकेतील डॉ. प्रवीण मधुकर गंटावार व त्यांची पत्नी डॉ. शिलू गंटावार यांनी लोकसेवकपदाचा गैरवापर करून तब्बल 2 कोटी 52 लाख 85 हजार 762 रुपयांची अपसंपदा अर्थात एकूण वैध उत्पन्नाच्या तब्बल 43.06 टक्के पैसा जमविल्याचे लाचलुचपत प्रतिबंधित विभागाच्या तपासात पुढे आले. त्यानंतर डॉ. गंटावार दाम्पत्यावर सीताबर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉर्म्युन रेसिडेन्सी, रामदास पेठ येथे राहणारे डॉ. प्रवीण गंटावार हे महापालिकेत वैद्यकीय अधिकारी (वर्ग 1) व त्यांची पत्नी डॉ. शिलु गंटावार या वैद्यकीय अधिकारी (वर्ग 1) या पदाचा कार्यभार सांभाळतात.

डॉ. गंटावार दांपत्याने आपल्या लोकसेवकपदाचा गैरवापर करून अपसंपदा जमविल्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर विभागाकडून चौकशीची सूत्रे सांभाळण्यात आली. बुधवारी करण्यात आलेल्या चौकशीत डॉ. गंटावार दाम्पत्याचे वाध उत्पन्नाचे स्रोत तपासण्यात आले. प्रकीण गंटावार फेब्रुवारी 2007 मध्ये इंदिरा गांधी रुग्णालय महानगर पालिका नागपूर येथे वैद्यकीय अधिकारी (सर्जन) या पदावर नोकरीस लागल्यापासून डिसेंबर 2015 या कालावधीतील पगारातून मिळालेले उत्पन्न, चल व अचल संपत्ती, मालमत्ता विक्रीतून मिळालेले उत्पन्न, चलनक्षम दस्तऐवजाचे मुदतीनंतर मिळालेल्या रकमा आदी उत्पन्नाचे स्रोतांची चौकशी करण्यात आली. त्यासोबतच गंटावार दाम्पत्यांनी स्थापन केलेल्या भागीदारी फर्म व प्रा.लि. कंपन्यांचीसुध्दा सखोल चौकशी करण्यात आली. सदरची कार्यकाही पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी, लक्ष्मण परतेती व गीता चौधरी यांनी केली.

तीन पथकांकडून झाडाझडती सुरू

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सखोल चौकशीअंती डॉ. गंटावार क त्यांची पत्नी डॉ. शिलू गंटावार यांनी आपल्या लोकसेवकपदाचा गैरवापर करून 2 कोटी 52 लाख 85 हजार 762 रुपयांची म्हणजेच एकूण वैध उत्पन्नाच्या 43.06 टक्के अपसंपदा जमविली असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, डॉ. गंटावार यांचे निवासस्थान व कार्यालयांची झडती लाचलुचपत प्रतिबंधित विभागाच्या तीन पथकामार्फत सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या