तोगडिया मोदींसोबत पॅचअप करणार

11

सामना ऑनलाईन । गांधीनगर

विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेले मतभेद मिटवून त्यांच्याशी समेट, पॅचअप करण्यास तयार झाले आहेत. देश आणि हिंदुत्वासाठी आपण माझ्यासोबत यावे आणि आपल्यातील मतभेद दूर करावेत, असे आवाहन तोगडिया यांनी मोदी यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.

मोदी यांच्याबरोबर तोगडिया यांनी संघाचे प्रचारक म्हणून काम केलेले आहेत. हे दोघेही एक चांगले मित्र होते, पण मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून दोघांमधील मतभेद वाढत गेले. गेल्या आठवडय़ात तर हे मतभेद फार टोकाला गेल्याचे तोगडिया यांनी गुजरातमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट झाले. पोलीस चकमकीत माझी हत्या केली जाणार होती म्हणून मी बेपत्ता होतो, असा खळबळजनक आरोप तोगडिया यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता त्या पत्रकार परिषदेत केला. त्यांचा हा रोख पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे होता. तोगडिया यांच्या या पत्रकार परिषदेनंतर त्यांना विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकारी अध्यक्ष पदावरून संघ हटविणार अशा बातम्या आल्या. या सर्व पार्श्वभूमीवर तोगडिया यांनी आता नमती भूमिका घेत मोदींसोबत समेट करण्याची भाषा केली आहे.

एकत्र येऊन देशासाठी काम करू!
मोदी यांना आवाहन करताना तोगडिया पुढे म्हणाले, चला नरेंद्रभाई एकत्र येऊन देशासाठी काम करूया. देशासमोर बेरोजगारी, शेतकऱयांची वाईट झालेली स्थिती, उद्योगांसमोरील आव्हाने आहेत. देशाला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबत येणे गरजेचे आहे. मोदी हे आमचे जुने मित्र आहेत. ज्या शिडीच्या सहाय्याने या शिखरावर तुम्ही पोहोचला त्या शिडीला तुम्ही तोडू नका, असेही आवाहन तोगडिया यांनी मोदी यांना केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या