‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल

165

सामना ऑनलाईन । प्रयागराज

उत्तर प्रदेशमधील आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने घरच्यांच्याविरोधात जाऊन एका दलित तरुणाशी लग्न केले होते. यानंतर वडिलांकडून जीवाला धोका असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता आणखी एका भाजप नेत्याच्या नातीचा व्हिडीओ समोर आला असून कुटुंबीयांकडून जीवाला धोका असल्याचा दावा मुलीने केला आहे.

हिंदुस्थान टाइम्स‘ने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपचे नेते आणि प्रयागराजचे माजी उपमहापौर मुरारी लाल अग्रवाल यांची नात दीक्षा अग्रवालने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दीशाने व्हिडीओच्या माध्यमातून कुटुंबीय आमच्या जीवावर उठल्याचे म्हटले आहे. कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन मी प्रेमविवाह केल्याने घरच्यांकडून जीवाला धोका असल्याचा दावा दीशाने केला आहे. तसेच माझा पती आणि सासरच्या व्यक्तींचे काही बरे वाईट झाल्यास याला माझे आजोबा आणि कुटुंबीय जबाबदार असतील असेही तिने व्हिडीओत म्हटले आहे.

अपहरणाची तक्रार अन् व्हिडीओ व्हायरल

दीशाने काही दिवसांपूर्वी ऋतुराज सिंह राजपूत याच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. परंतु आता दीशाने व्हिडीओ पोस्ट करून मी माझ्या मर्जीने लग्न केल्याचे म्हटले आहे. तसेच जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. ‘माझं नाव दीक्षा अग्रवाल राजपूत असून मी 5 जुलै 2019 रोजी ऋतुराज सिंह राजपूत याच्याशी माझ्या मर्जीने लग्न केल.. ऋतुराजसोबत मी आनंदात आहे. आजोबा माजी उपमहापौर मुरारी लाल अग्रवाल, पवन अग्रवाल आणि इतर नातेवाईकांना माझी विनंती आहे की पोलीस प्रशासन व राजकीय ताकद वापरून त्रास देणे थांबवा. मी माझ्या पतीसोबत आनंदात राहू इच्छिते. माझ्यासोबत जर काही चुकीचे झाले तर त्याला घरचे लोक जबाबदार असतील’, असे दीक्षाने व्हिडीओत म्हटले आहे.

prayagraj

साक्षीचा व्हिडीओ आला होता समोर
याआधी उत्तर प्रदेशमधील आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने दलित तरुणाशी लग्न केल्यामुळे वडील आपल्या जीवावर उठले असून त्यांनी आम्हाला मारायला गुंड पाठवले असल्याचा आरोप व्हिडीओतून केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. यानंतर साक्षी आणि अजितेश यांनी पोलिसांकडे सुरक्षा मागितली होती.

आपली प्रतिक्रिया द्या