मुंबई, ठाणे, नवी मुंबईत वळीव, मध्य रेल्वेची चाके रुतली

36

सामना ऑनलाईन, मुंबई

वळवाच्या पावसाने आज मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला जोरदार तडाखा दिला. या पावसामुळे मध्य रेल्वेची ऐन पिकअवरमध्ये दैना उडाली. घाटकोपर येथे ओव्हरहेड वायरमधील पॉवर सप्लाय बंद पडल्याने मेन तसेच हार्बरच्या डाऊन दिशेची वाहतूक पावणेआठच्या सुमारास ठप्प पडली. रात्री ठाणे स्टेशनवरही असेच घडले. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱया प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

हार्बर मार्गावर सकाळी ९.३०च्या सुमारास चेंबूर आणि टिळकनगरदरम्यान रुळांना तडे पडून सुरू झालेले बिघाडसत्र नऊ लोकल रद्द होण्यात झाले. त्यानंतरही लोकल दिवसभर उशिरानेच धावत असताना शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाच्या सरींनी लोकलचे वेळापत्रक पुरते बिघडले.

शुक्रवारी सायंकाळी कामावरून घरी परण्याच्या बेतात असलेल्या मुंबईकरांना ऐन गर्दीच्या पिकअवरमध्ये पावसाने अवचित खिंडीत गाठले. अचानक आलेल्या सरींनी जागोजागी ओव्हरहेड वायर्समध्ये शॉर्टसर्किट होऊन लोकल जागच्या जागी खोळंबल्या. या गोंधळास रात्री ७.४० वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. हार्बरवर सानपाडा-मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर तर मेन लाइनवर माटुंगा-कुर्ला डाऊन मार्गावर आणि विद्याविहार-कांजुरमार्ग येथे डाऊन जलद मार्गावर ओव्हरहेड वायरमध्ये पुरवठा ठप्प झाला. वाशी स्थानकाजवळही ओव्हरहेड वायर्समध्ये बिघाड झाल्याने दुरुस्ती पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

रात्री ८.३० पर्यंत गोंधळ सुरू
मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते कल्याणपर्यंत तर हार्बरवर वाशी ते पनवेलपर्यंत एकामागोमाग लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि सायंकाळी उशिरा कामावरून घरी परतणाऱया प्रवाशांची तासभर गाड्यांमध्येच लटकंती झाली. रात्री ८.०९ वा. हार्बरचा अप तर ८.१४ वा. डाऊन मार्ग सुरू झाला. तर मेनलाइनवर डाऊन धीमा मार्ग ८.२१ तर डाऊन जलद मार्ग ८.३२ वाजता हळूहळू सुरळीत झाला. पश्चिम मार्गावरील लोकल मात्र याच काळात कोणत्याही व्यत्ययाविना सुरळीत सुरू होत्या.

गेले काही दिवस राज्याच्या विविध भागांत गारांसह हजेरी लावणाऱ्या पावसाने आज मुंबईसह नवी मुंबईतील काही भागांत हजेरी लावून उकाड्याने हैराण झालेल्यांना मोठा दिलासा दिला. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱयांची त्रेधा उडाली, तर रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

सायंकाळी सात-सवासातच्या सुमारास नवी मुंबईच्या नेरूळ, खारघर, पनवेल येथे कोसळणारा पाऊस आठ-सवाआठच्या सुमारास मुंबईकडे वळला. मुंबईत जोगेश्वरी, सायन या भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. अचानक कोसळलेल्या या पावसाने काही भागातच आपला मोर्चा वळवला असला तरी त्याच्या आगमनाच्या या वार्ताने लोक सुखावले आहेत.

मोटरसायकली घसरल्या
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांत पावसाच्या सरी कोसळल्या. या पहिल्याच पावसामुळे मोटरसायकलस्वारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोटारसायकल घसरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी अनेक जण किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

कल्याणमध्ये विजांचा कडकडाट
आज सायंकाळी ७.३० च्या सुमारास शहापूर तालुक्यातील भातसानगर खर्डीसह नवी मुंबईत वळवाच्या पावसाने हजेरी लावली. कल्याण, पनवेल या भागात पावसाचा शिडकावा झाला. विजेचा कडकडाट तसेच वादळीवाऱयामुळे येथील परिसर दणाणून गेला. उन्हाच्या कडाक्यामुळे अंगाची लाही लाही झालेल्या रहिवाशांना या पावसामुळे गारवा निर्माण झाला. पनवेलमधील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला.

या मान्सूनपूर्व सरी
मुंबईसह महाराष्ट्रात सध्या पडणारा पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व सरी आहेत. अजून तीन दिवस आकाश ढगाळ राहील तसेच ठिकठिकाणी अशा तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे. आज शहरापेक्षा पूर्व आणि पश्चिम उपनगरांत पडलेल्या सरींचे प्रमाण अधिक आहे.
– के. एम. होसाळीकर, उपमहासंचालक, कुलाबा वेधशाळा

धुळीच्या वादळानंतर आला पाऊस
वळवाच्या पावसाने मुंबईकरांची अक्षरशः तारांबळ उडाली. मुंबई, नवी मुंबईत अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. सोसाट्याच्या वाऱ्याने परिसरात पहिल्यांदा धुळीचे, वाळूचे वादळ आले आणि पाठोपाठ पाऊस दाखल झाला.

आपली प्रतिक्रिया द्या