मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा

15

संभाजीनगर: मराठवाडय़ासह पश्चिम महाराष्ट्राला आज अवकाळी पाऊस आणि गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. वादळी वारा, जोरदार पावसामुळे गहू, हरभरा, द्राक्ष आणि ज्वारीचे उभे पीक आडवे झाल्याने शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. बीडमध्ये पाचजणांचा वीज पडून मृत्यू झाला, तर अनेक जनावरेही दगावली. वादळामुळे घरांचे पत्रे उडून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे दुष्काळातून सावरणारा गोरगरीब शेतकरी मात्र हवालदिल झाला.

चार वर्षे भयंकर अवर्षणाचा सामना करणाऱया मराठवाडय़ाने यंदा कुठे मोकळा श्वास घेतला. पावसाने मेहेरबानी केल्याने मराठवाडय़ातील लहान-मोठी धरणे, तलाव तुडुंब भरले. शेतशिवार हिरवेगार झाल्याने शेतकरीही सुखावला, पण हे सुख निसर्गाला पाहवले नाही. मराठवाडय़ात अनेक ठिकाणी दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यातच आज धाराशीव, लातूर, परभणी, नांदेड, बीड जिह्यात दुपारी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.  धाराशीव जिह्यातील कळंब परिसराला गारपिटीने झोडपले. खडकी, लोहारा, करंजकल्ला, हासेगाव परिसरालाही अवकाळीने झोडपून काढले. नांदेड जिह्यात तामसा, हिमायतनगर, लोहा परिसरात दुपारी तासभर पाऊस झाला.

लातूर जिह्यात सकाळपासूनच वादळी वाऱयांनी थैमान घातले होते. दुपारी आभाळ भरून आले आणि तुफान पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर समोरचे काही दिसत नव्हते. अवघ्या अर्ध्या तासात रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. निलंगा, औसा, बेलकुंड, तावशी, वांगजी शिवारात गारपीट झाल्याने पिके आडवी झाली. या अवकाळीने फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. परभणी जिह्यातही सोनपेठ, लिमला, पाथ्री भागाला अवकाळी पावसाने जबर तडाखा दिला. काही ठिकाणी गाराही पडल्या. यामुळे फळबागांचे विशेषतः आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.

हातातोंडाशी आलेला घास

चार वर्षांपासून दुष्काळामुळे मराठवाडय़ातील शेतशिवारावर स्मशानकळा पसरली होती. यंदा पावसाने शेतांमध्ये प्राण फुंकला.  सध्या गहू, ज्वारी, हरभऱयाची काढणी सुरू असल्याने शेतकऱयांनी काढलेले पीक शेतातच ठेवले आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने हे पीक भिजले असून नुकसानीचा अंदाज लावणेही कठीण आहे.

बीड जिह्याला वादळी पावसाचा तडाखा

बीड जिह्यात दुपारी वादळी वाऱयासह तुफान पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. परळी, तेलगाव, बीड, पाटोदा, केज, धारूर भागांत पावसाने अक्षरशः धुमशान घातले. माजलगावमध्ये वादळी वाऱयाने अनेक घरांवरचे पत्रे उडाले. केज तालुक्यात येवता येथील ओंकार सटवा निर्मळ (११) हा बालक वीज पडून ठार झाला. तालुक्यातीलच दरडवाडी येथील भागवत रामदेव दराडे (४५) यांचाही वीज पडल्याने मृत्यू झाला. परळी तालुक्यातही कवथाली येथील आश्रुबा गायकवाड (५७) व सुशीलाबाई कुंभार (४०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. सातेफळ येथे वीज पडून आश्रुबा भांगे यांचे दोन बैल दगावले.

आपली प्रतिक्रिया द्या