शेतकरी मंदीबाईच्या फेऱ्यात अडकणार; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत

सामना ऑनलाईन । बुलडाणा

जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध आणि गेल्या ३५० वर्षांहून अधिकची परंपरा लाभलेल्या भेंडवळची भविष्यवाणी कथन करण्यात आली आहे. या भेंडवळीत नैसर्गिक प्रतिकांची घटमांडणी करुन देशाच्या आर्थिक व सर्व प्रकारच्या स्थितीविषयी भाष्य करण्यात आले आहे. या भाकितामध्ये शेतकरी मंदीच्या फेऱ्यात अडकणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र पाऊस यंदा चांगला होईल, दुष्काळ नसेल असं सांगत शेतकरी आणि राज्यातील नागरिकांना दिलासा देणारं भाकीतही भेंडवळीच्या घटमांडणीत वर्तवण्यात आले आहे.

पहाटेच्या सुमारास चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने हे भविष्यकथन केले. जूनमध्ये पाऊस कमी असेल जुलै महिन्यात पाऊस खऱ्या अर्थाने जोर धरेल असं या भविष्यवाणीत सांगण्यात आलं आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात चांगला पाऊस होईल असं भाकीतही वर्तवण्यात आलं आहे. जून महिन्यामध्ये पेरणी कमी असेल हळूहळू ती वाढत जाईल असंही सांगण्यात आलं आहे. राज्याच्या सर्वदूर भागात सर्वसाधारण पाऊस असेल दुष्काळाचं राज्यावर सावट नसेल असं भाकीत वर्तवण्यात आल्याने शेतकरी वर्ग आनंदीत आहे. यापूर्वी हवामान खात्यानेही चांगला पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज वर्तवला होता.

अशी होते ‘भेंडवळभविष्यवाणी’

गेल्या ३५० वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं. दरवर्षी अक्षयतृतीयेला घट मांडले जातात आणि दुसऱ्या दिवशी भविष्य वर्तवण्याची पद्धत आहे. सूर्यभान महाराजांनी ही प्रथा सुरु केली. आता त्यांचे वंशज भविष्य वर्तवण्याचं काम करतात.

पिकांसाठी भेंडवळीच्या भविष्यवाणीत काय सांगितले आहे ?

  • ज्वारीचे भाव वाढतील
  • तूर पीक सर्व साधारण असेल त्याचे अमाप पीक येणार नाही
  • मुगाला काही काळासाठी चांगली तेजी येईल
  • तिळाचे पीक सर्वसाधारण राहील
  • बाजरीचे पीक साधारण असेल
  • जवस, वाटाण्याचे  पीक  हे देखील सर्वसाधारण राहील
  • युद्धाचे संकेत नसून संरक्षण खाते मजबूत स्थितीत असेल
  • देशाची आर्थिक आणि राजकीय परिस्थिती या वर्षात ठीक राहील

गेल्या वर्षी भेंडवळीच्या भविष्यवाणीमध्ये जे धोके सांगण्यात आले होते ते बहुतांश खरे ठरल्याचं दिसून आलं आहे. गेल्या वर्षीत्या भाकितामध्ये भरपूर अवकाळी पावसाचा होईल, नैसर्गिक आपत्ती येईल, रोगराई पसरेल आणि चलन तुटवड्यामुळे देश मोठ्या आर्थिक संकटात सापडेल अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. तसेच पंतप्रधानांचे आसन सुरक्षित असले तरी देशाला घुसखोरी, दहशतवाद या समस्यांचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागणार आहे असंही सांगण्यात आलं होतं.  देश आर्थिक संकटामुळे त्रस्त होईल, अशी भविष्यवाणीही करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या