एसटी महामंडळाने या वर्षी जानेवारीपासून तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना यूपीआयद्वारे पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्याला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. जानेवारी ते मे 2024 या पाच महिन्यात यूपीआयद्वारे 14 लाख 32 हजार तिकिटांची विक्री झाली असून यातून महामंडळाला 35 कोटी 87 लाख 15 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
एसटी प्रवासादरम्यान अनेकदा तिकिटाच्या सुटय़ा पैशांवरून कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात खटके उडतात. कॅशलेसच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत जानेवारीपासून प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी यूपीआय पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिली. त्यासाठी सर्व वाहकांसाठी अॅण्ड्रॉईड तिकीट इश्यू मशीन्स नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. या मशीनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येते. या प्रणालीला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. जानेवारीत यूपीआयद्वारे दिवसाला केवळ 3500 तिकिटे यूपीआयद्वारे काढली जात होती. त्यात मेमध्ये पाचपटीने वाढ झाली असून आता दिवसाला सरासरी 20 हजार 400 तिकिटे काढली जात आहेत. अर्थात, यूपीआय पेमेंटद्वारे महामंडळाच्या खात्यावर पैसे जमा होण्याचे प्रमाणदेखील वाढले असून ते जानेवारी 2024 मध्ये प्रतिदिन 10 लाख रुपये होते, आता मे मध्ये 45 लाख रूपये प्रतिदिन झाले आहे. दरम्यान, प्रवाशांनी प्रवासादरम्यान नेहमी पंडक्टरकडे यूपीआय तिकिटाची मागणी करावी जेणेकरून सुटय़ा पैशावरून होणारे वादविवाद टाळले जातील. यूपीआय पेमेंटद्वारे क्यूआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली आहे.