गर्भवती असतानाच महिलेला पुन्हा दिवस गेले

22

सामना ऑनलाईन। लंडन

इंग्लंडमधील एका पस्तीस वर्षांच्या महिलेला गर्भवती असतानाच पुन्हा दिवस गेल्याचे कळताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पण डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनानंतर या महिलेने तिळ्यांना जन्म दिला असून बाळं-बाळंतीण सुखरुप असल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. गेल्या शंभर वर्षात गर्भवती महिलेस पुन्हा दिवस गेल्याची ही जगातली तिसरी अजब घटना आहे.

गर्भधारणेस दोन आठवडे झाल्यानंतर या महिलेस उलट्या व अपचनाचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी तिला औषधही दिली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट तिची प्रकृती ढासळू लागली. त्यानंतर तिची सोनोग्राफी व इतर तपासण्या करण्यात आल्या. यात तिला दिवस गेल्याचे समोर आल्याने डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण तिच्या गर्भात आधीच दोन जुळी बाळं वाढत होती. यात अचानक हे तिसरे बाळ कुठून आले असा प्रश्न डॉक्टरांबरोबरच तिलाही पडला. पण तीन महिने उलटून गेल्याने गर्भपात करणे धोकादायक होते. शिवाय हे तिसरं बाळ सुदृढ दिसत होतं. दोन जुळ्यांसोबत त्याचीही वाढ वेगाने होत होती. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर महिलेने या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. या महिलेला सहा महिने डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. या महिलेने आता तिळ्यांना जन्म दिला आहे.

वैद्यकीय भाषेत याला सुपरफोएटेशन असे म्हणतात. ही दुर्मिळ घटना असून १८६५ मध्ये रोममध्ये चार महिन्याची गर्भवती असलेल्या एका महिलेला दिवस गेले होते. अशी माहिती डॉक्टर व प्राध्यापक सायमन फिशेल यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या