हळदीच्या कार्यक्रमात मारहाण झाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू

17

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

संभाजीनगर येथील पैठण गेट परिसरात हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या हाणामारीत ३१ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंजुषा अजय कदम असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद क्रांती चौक पोलीस करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण गेट येथील परिसरात २ फेब्रुवारी रोजी हळदी समारंभ होता. गल्लीतील कार्यक्रम असल्यामुळे मंजुषा यांचा पुतण्या शेखर कदम हा मदत करत होता. यावेळी समारंभ चालू असताना अचानक शेखर कदम यास काही तरुणांनी मारहाण केली. शेखर यास मारहाण होत असतानाचे पाहून मंजुषा या सोडविण्यासाठी गेल्या असता काही तरुणांनी मंजुषा यांच्या पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत मंजुषा गंभीर जखमी झाल्या. मंजुषा यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.

रविवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास मंजुषा यांचा मृत्यू झाला. मंजुषा या दोन महिन्यांच्या गर्भवती होत्या. मंजुषाचे पती अजय कदम हे मजुरीचे काम करतात. या दांपत्याला एक मुलगा असून मंजुषांच्या मृत्यूची बातमी कळताच परिसरावर शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या