पिसाळलेल्या रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, वाचा धक्कादायक बातमी

898

भटक्या कुत्र्यांचा त्रास मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये पाहायला मिळतो. या कुत्र्यांच्या हल्ल्यात काही जणांना जीवही गमवावे लागले आहेत. हिंदुस्थानात जसा हा त्रास आहे तसाच तो विदेशातही आहे. फ्रान्समध्ये जंगली कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला गर्भवती असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

फ्रान्समधल्या पॅरिसशहराजवळ असलेल्या विलर्स-कॉटरेट्स या जंगली भागात 29 वर्षांची गर्भवती महिला फिरायला गेली होती. तिच्यासोबत तिचा पाळीव कुत्राही होता. फिरत असताना या कुत्र्यावर आणि महिलेवर जंगली कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गर्भवती महिला गंभीर जखमी झाली. या महिलेला झालेल्या जखमा इतक्या गंभीर स्वरुपाच्या होत्या की मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला. वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने आणि अतिरक्तस्त्रावामुळे या महिलेचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर बराच वेळ या महिलेचा मृतदेह त्याच ठिकाणी पडून होता. या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना जेव्हा हा मृतदेह दिसला तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवलं. महिलेच्या मृतदेहाच्या तपासणी केली असता महिलेच्या अंगावर अनेक ठिकाणी चावे घेतल्याच्या खुणा दिसून आल्या. डॉक्टरांनी या खुणा कुत्रा चावल्यानेच झाल्याचं सांगितलं. कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर या महिलेने तिच्या जोडीदाराला कुत्र्यांनी हल्ला केल्याचं कळवलं होतं, मात्र ती फारशी माहिती देऊ शकली नाही. फ्रान्समधल्या स्थानिक वर्तमानपत्रांनी दिलेल्या बातम्यांमध्ये म्हटले आहे की या हल्ल्यानंतर जंगल परिसरातल्या 93 रानटी कुत्र्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील किमान 5 रानटी कुत्र्यांनी महिलेवर हल्ला केल्याचं निष्पन्न झालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या