जीवनशैली: ट्रेकिंग

367
प्रातिनिधीक फोटो

>>संग्राम चौगुले

सह्याद्रीत कोणत्याही ऋतूत जावं… प्रत्येक वेळी त्याचे रूप निराळे. पाहूया… ट्रेकिंगसाठी काय तयारी करावी…

 

ट्रेकिंगवर पहिल्यांदा जाणारेच नव्हे, तर सर्वच ट्रेकर्सने आपला फिटनेस पुरेसा राखण्याची गरज आहे. कारण एक तर पाठीवर वजनदार बॅग असते आणि त्याबरोबरच ती घेऊन उंचावर चढायचे असते. बरेच चालायचेही असते. काहीवेळा तर ऑक्सिजन कमी असलेल्या ठिकाणी जावे लागते. अशावेळी फिटनेस चांगला असेल तर नेटाने चढून जाता येईल. मुळातच ट्रेकिंग हे एक साहसाचे काम आहे. दुर्गम भागात पैदल चालून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. त्यासाठी उन्हातान्हात बरेच तास, बरेच दिवस किंवा बरेच आठवडे वा महिनेही लागू शकतात. या सगळ्यालाच ट्रेकिंग म्हटलं जातं. त्यामुळे ट्रेकिंगची नीट आखणी केलेली असेल, योग्य आणि पुरेसे सामान घेतलेले असेल तर ट्रेकिंग यशस्वी करता येते.

ट्रेकिंगची योजना लीडरने आखायची असते. त्यानुसार बाकी सगळ्या ट्रेकर्सने वागायचे. या ट्रेकिंगचा अवधी, सहभागी होणाऱ्या सदस्यांची संख्या, त्यानुसारच बरोबर घेतलेले धनधान्य, चुली, भांडी असली पाहिजेत. याबरोबरच जेथे जायचे त्या जागेची नीट माहिती करून घेतलेली असेल तर ट्रेकिंग यशस्वी होते. प्रत्येक व्यक्तीबरोबर ठराविक सामान द्यायचे असते. त्या त्या सामानाची त्या व्यक्तीने जबाबदारी घ्यायची असते. यातच कुणाकडे औषधे, कुणाकडे उपकरणे तर कुणाकडे पैशाची जबाबदारी सोपवलेली असते.

सर्वप्रथम ट्रेकिंगवर जाण्यापूर्वी निश्चित केलेल्या ठिकाणाची, तेथे जाण्याच्या मार्गाची पूर्ण माहिती असायला पाहिजे. ट्रेकिंग किती दिवसांचे आहे, त्यात कोणत्या दिवशी आपण नक्की कोठे असू शकतो हेही माहीत असायला हवे. विशेषतः जास्त उंच ठिकाणी जाण्यासाठी अंतर कमी असले तरीही वेळ जास्त लागतो. याची आकडेवारी जवळ असली पाहिजे. दुसरे म्हणजे धनधान्य… लोक किती आहेत त्यानुसार धान्य बरोबर घेतले पाहिजे. डाळी ट्रेकिंगसाठी पौष्टिक आहार ठरतात. त्यामुळे ट्रेकर्स किंवा पर्वतारोहींनी डाळींवर भर द्यायला हवा. बोर्नव्हिटा आणि कॉफी आपल्याबरोबर जास्तीतजास्त प्रमाणात ठेवले पाहिजे. आहारात पाहायचं झालं तर ट्रेकर्सने आपल्याबरोबर ड्रायफ्रूट्स (सुका मेवा) ठेवायला हवा.

तिसरे म्हणजे ट्रेकिंगवर जेवण बनवावे लागते. त्यासाठी भांडी, चुली आणि इंधन वाहून न्यावे लागेल. आगपेटी आणि चाकू जवळ असायला हवा. एक लक्षात ठेवले पाहिजे की, इंधन म्हणून गॅस वा रॉकेल जवळ बाळगून प्रवास करायला बंदी आहे. ते धोक्याचेही आहे. त्यासाठी स्थानिक लोकांकडून त्याची व्यवस्था करून घ्यायची असते. ट्रेकिंगसाठी चौथी महत्त्वाची तयारी म्हणजे तेथे रात्री तंबू लावावे लागतात. सदस्यांची संख्या पाहून तंबूंची व्यवस्था करायची असते. ट्रेकर्सच्या म्होरक्याने ती जबाबदारी पार पाडायची असते.

काय करावे?

* कुठे जाणार याची पूर्ण माहिती असली पाहिजे.

* जेथे जाणार तेथील स्थानिक लोकांबद्दल माहिती वाचून जायचे. त्यांची संस्कृती, खाणे-पिणे माहीत असायला हवे.

* बॅग हलकी असली पाहिजे. तरीही त्यात गरजेच्या सगळ्या वस्तू असायला हव्यात.

* स्थानिक नियम आणि रितीरिवाज मोडायचे नाहीत हे लक्षात ठेवायचे.

* जेथे जाणार तेथील रुग्णालय, पोलीस ठाणे, डिस्ट्रीक मॅजिस्ट्रेट ऑफिस यांचे नंबर्स जवळ असायला हवेत.

* विनम्र राहायचे. जाणकार व्यक्तीची मदत घ्या.

* ठिकाण सापडत नसेल तर स्थानिक गाईडची मदत घ्यायची.

* दुसऱ्याच्या पुढे जाण्याचा अतिउत्साह दाखवू नका. क्षमतेनुसार चालत राहा. अस्वस्थता वाटू लागली तर लीडरचा खबर करा.

* किडेमुंग्या किंवा पाण्यापासून बचाव करणारे स्मार्ट शूज घालायला विसरायचे नाही.

आपली प्रतिक्रिया द्या