सत्ताबदलानंतर WHO मध्ये सहभागी होण्याचे अमेरिकेचे संकेत; बायडन यांचा पुढाकार

अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जो बायडन यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर टीका केली होती. आता अमेरिकेत सत्तांतर झाल्याने बायडन यांनी डब्लूएचओमध्ये पुन्हा सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका डब्लूएचओला पुन्हा आर्थिक मदत करण्याच्या विचारात आहे. बायडन यांचे हे संकेत महत्त्वाचे मानले जात आहे.

कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी अमेरिकेत नवे निर्देशही जारी करण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी पुढील 100 दिवस अमेरिकेत सर्वांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात मास्क घालण्याची सक्ती नव्हती. मास्कचा वापर ऐच्छिक होता. त्यामुळे बायडन यांनी कोरोना विरोधात लढण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाच लाखांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याला प्रशासन प्राधान्य देणार असल्याचे बायडन यांनी सांगितले. कोरोना महामारीशी लढण्यासाठी बायडन कमीतकमी 10 करारांवर स्वाक्षऱ्या करणार आहेत.

अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. परिस्थिती नियंत्रणात येण्याऐवजी अधिक बिकट होत आहे. एप्रिल महिन्यापासून मास्क वापरण्याची सक्ती केली असती तर सुमारे 50 हजार व्यक्तींचा जीव वाचला असता, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मास्क वापरणे गरजेचे असल्याचे बायडन यांनी सांगितले. आपण या महामारीवर मात करून निश्चितच विजय मिळवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोरोना व्हायरसविरोधात आवश्यक ती पावले उचलण्यात येत असल्याचे बायडन यांनी सांगितले.

जगभरात कोरोना महामारी रोखण्यासाठी अमेरिकेकडून आवश्यक ती पावले उचलण्यात येतील, असे बायडन यांचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिकन कर्मचाऱ्यांची कपात प्रक्रिया रोखण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे डब्लूएचओला अमेरिका आर्थिक मदत करणार असल्याचेही ते म्हणाले. ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात डब्लूएचओवर टीका करत त्यांच्या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला होता. आता सत्ताबदलानंतर बायडन यांनी डब्लूएचओमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या