शौर्य, धैर्याची महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली!

महाराष्ट्राला इतरांच्या रक्षणासाठी धावून जाण्याची परंपरा आहे. या परंपरेत शौर्य आणि धैर्यासाठीचे मानाचे पदक पटकावून या आपल्या बहाद्दरांनी महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदक पटकावणाऱया पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच जीवन रक्षा आणि अग्निशमन सेवा पदक पटकावणाऱयांचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्र म्हटले की, इतरांच्या रक्षणासाठी आघाडीवर राहणारा प्रदेश अशी ओळख आहे. ही महाराष्ट्राची दिमाखदार परंपरा पोलीस दलात उत्तम कामगिरी बजावणाऱया शूरवीरांसह, इतरांच्या बचावासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावणारे आणि आगीसारख्या दुर्घटनेत सर्वात पुढे राहणाऱया बहाद्दरांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने उजळून टाकली आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आणि अग्निशमन दलातील शूरवीरांनी कोरोना काळातही अजोड अशी कामगिरी बजावली आहे. या सर्वांना त्यांच्या कामाची राष्ट्रीयस्तरावरून दाद मिळते आहे. ही महाराष्ट्रासाठीही गौरवशाली बाब आहे. या सर्वांच्या कामगिरीतून या क्षेत्रात येणाऱया होतकरून पिढयाही निश्चितच प्रेरणा घेतील. या पुरस्कारासाठी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच या त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीत त्यांना घरातून साथ देणाऱया कुटुंबियांचे आणि जीवलगांचे, मार्गदर्शक यांचेही अभिनंदन.’

आपली प्रतिक्रिया द्या