क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याचा बनाव करून व्यापाऱ्याला भरदिवसा गंडवले

दुचाकीवरून घराकडे निघालेल्या व्यापाऱ्याला पाठीमागून दोघा अज्ञात व्यक्तिंनी हाक मारून थांबवले. ते दोघेही व्यापाऱ्याच्या मागून दुचाकीवरून जात होते. आम्ही क्राईम ब्रांचचे पोलीस आहोत, तुमची चौकशी करायची आहे, असे सांगून व्यापाऱ्याच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन गंडविल्याची घटना मोंढा मार्केट गेवराई येथे 12 ऑक्टोबरला भर दिवसा घडली.

महेश कॉलनी येथे राहणारे गंगाभीषण बिहारीलाल भुतडा (59) यांचे मोंढा येथे कडधान्याचे दुकान आहे. दुपारी साडेतीन वाजता ते दुचाकीवरून त्यांच्या घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना हाक मारून थांबवले. आम्ही गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस असून रात्री 6 लाखांचा गांजा जप्त केला आहे. याबाबत तुमच्याकडे चौकशी करायची आहे यासाठी तुम्हाला साहेबांनी बोलावले असल्याचे सांगून त्यांनी गंगाभीषण बिहारीलाल यांना त्यांच्या खिशातील हातरुमाल काढायला सांगून त्यावर त्यांच्याजवळील दागिने व रोख रक्कम ठेवण्यास सांगितले. त्यांचे ऐकून गंगाभीषण यांनी सोन्याची चेन, 5 ग्रॅमची अंगठी, मोबाईल आणि खिशातली रोख रक्कम रुमालावर ठेवली. त्यापैकी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 90 हजारांचा ऐवज घेऊन दोन अज्ञात व्यक्ती फरार झाल्या.

या घटनेची तक्रार गंगाभीषण यांनी गेवराई पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणाचा तपास मुख्य पोलीस शिपाई तुकाराम बोडखे करत आहेत. या फसवणुकीच्या घटनेचे दृष्य मोंढा मार्केटमधील हनुमान मशनरीसमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या